ग्रामसेवकाला लाच घेताना पकडले
By Admin | Published: November 17, 2014 12:05 PM2014-11-17T12:05:30+5:302014-11-17T12:15:36+5:30
शासनाच्या योजनांचे थकित ठेवलेले अनुदान देण्यासाठी लाभार्थ्यांकडून दोन हजार रुपयांची लाच घेणार्या पाथरड येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले आहे.
नांदेड : शासनाच्या योजनांचे थकित ठेवलेले अनुदान देण्यासाठी लाभार्थ्यांकडून दोन हजार रुपयांची लाच घेणार्या पाथरड येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले आहे.
मुदखेड तालुक्यातील पाथरड (रेल्वेस्टेशन) येथील ग्रामपंचायतीमध्ये सुनील रामराव पारडे हे ग्रामसेवक आहेत. त्यांनी महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेअंतर्गत स्वच्छालयाचे मंजूर झालेले अनुदान एक वर्षापासून थकित ठेवले होते. याबाबत लाभार्थ्यांनी पाठपुरावा केला असता सात लाभार्थ्यांना त्यांनी प्रत्येकी पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. परंतु सध्या ग्रामसेवक पारडे हे पिंपळकौठा येथे कर्तव्यावर होते. याबाबत लाभार्थ्यांनी १४ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली.
त्यानंतर सापळा रचण्यात आला. १६ नोव्हेंबर रोजी नांदेड शहरातील राज कॉर्नर येथे तडजोडीअंती दोन हजार रुपयांची लाच घेण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार ग्रामसेवक पारडे यांना लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी मुदखेड पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. लाचलुचपतचे पोलिस अधीक्षक शिरिष देशपांडे, पोलिस उपअधीक्षक एम.जी.पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. अशोक देशमुख, व्यंकट शिंदे, शेख चाँद, वामन कोकाटे, अनिल कदम यांनी सापळा कार्यवाहीत सहभाग नोंदविला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक एम.जी.पठाण करीत आहेत. /(प्रतिनिधी)