कृष्णूरच्या मेगा अॅग्रो अनाज कंपनीच्या गोदामात भुश्याची पोती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:45 AM2018-08-30T00:45:55+5:302018-08-30T00:46:11+5:30
कृष्णूरच्या मेगा अॅग्रो अनाज कंपनीच्या गोदामात शासकीय वितरण व्यवस्थेतील गव्हाची सहा हजार पोती असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे़ या प्रकरणात गेल्या तीन दिवसांपासून जप्त केलेल्या धान्याची मोजदाद सुरु असताना बुधवारी मेगा अॅग्रोच्या गोदामातील पोत्यांची तपासणी करण्यात आली़ त्यामध्ये भुस्सा भरलेली अनेक पोती असल्याचे आतापर्यंतच्या तपासणीत आढळून आले आहे़ त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : कृष्णूरच्या मेगा अॅग्रो अनाज कंपनीच्या गोदामात शासकीय वितरण व्यवस्थेतील गव्हाची सहा हजार पोती असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे़ या प्रकरणात गेल्या तीन दिवसांपासून जप्त केलेल्या धान्याची मोजदाद सुरु असताना बुधवारी मेगा अॅग्रोच्या गोदामातील पोत्यांची तपासणी करण्यात आली़ त्यामध्ये भुस्सा भरलेली अनेक पोती असल्याचे आतापर्यंतच्या तपासणीत आढळून आले आहे़ त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळत आहे़
मेगा अॅग्रो अनाज कंपनीवरील छाप्याला महिना उलटल्यानंतर पोलिसांनी आपल्याकडील जप्त धान्याचे ट्रक पुरवठा विभागाच्या ताब्यात दिले़ पुरवठा विभागाने या धान्याची मोजदाद करण्यासाठी सहा अधिकाऱ्यांचे पथक नेमले आहे़ त्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांचाही समोवश आहे़ पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उभे असलेले हे ट्रक खुपसरवाडी येथील शासकीय धान्य गोदामात नेण्यात आले़ या ठिकाणी या धान्याची मोजदाद सुरु आहे़ गेल्या तीन दिवसांपासून ही मोजदाद सुरु असून त्यामध्ये लाखो रुपयांच्या या धान्याला कोंब फुटल्याचे आढळून आले़ त्यानंतर बुधवारी हे पथक कृष्णूरच्या मेगा अॅग्रो अनाज कंपनीत गेले़ या ठिकाणी पोत्यांची तपासणी सुरु असून आतापर्यंत धान्यापेक्षा भुस्सा भरलेलीच अधिक पोती येथे आढळली़ तपासणी पथकाला प्रत्येक पोते उघडून त्यात धान्य की भुस्सा याची तपासणी करावी लागत आहे़ तसेच त्याचे वजनही केले जात आहे़ अद्यापही मोजणी पूर्ण झाली नसून पोलिसांच्या दाव्याप्रमाणे या ठिकाणची पोती सहा हजार की त्यापेक्षा कमी? हे मोजणी झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे़
पारसेवारच्या जामिनावर आज सुनावणी
बिलोली न्यायालयात धान्य वाहतुकीचा कंत्राटदार राजू पारसेवार याच्या अटकपूर्व जामिनावर बचाव आणि सरकार पक्षाचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत़ सोमवारी बचाव पक्षाने तर बुधवारी सरकार पक्षाने युक्तिवाद केला़ न्या़एस़व्ही़ कतरे यांच्यासमोर सरकार पक्षाच्या वतीने अॅड़दिलीप बोमनाळीकर यांनी बाजू मांडली़ दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर या प्रकरणात आता गुरुवारी निर्णय होणार आहे़