ग्रासरूट इनोव्हेटर : शेतकऱ्याने वीज खंडावर मात करत असा केला मोटार पंप सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:09 PM2018-11-20T12:09:40+5:302018-11-20T12:10:36+5:30
देळूब ( बु ) येथील शेतकरी नूरखान पठाण यांनी यंत्राच्या साहाय्याने पिकांना पाणी देण्याचा प्रयोग तीन वर्षांपासून करत असून तो यशस्वी झाला आहे़
- युनूसमियाँ नदाफ (पार्डी, नांदेड)
अर्धापूर तालुक्यात विहीर व बोअरवेल प्रमुख स्रोत असून इसापूर धरण्याच्या पाण्यावर तालुक्यातील बहुतांशी शेती सिंचनावर आहे़ इसापूर धरणाचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध झाल्यावर विहीर व बोअरवेल याची सुद्धा पाणीपातळीत झपाट्याने वाढ होते़ परंतु मागील काही वर्षांपासून शेतीसाठी मिळणारा वीज पुरवठा कमी झाल्याने पिके वाळून जात आहेत़ तासनतास विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने बागायती शेती वाळून जात आहेत़
रोहित्र ना दुरुस्त झाल्यावर एक-एक महिना याकडे कोणी लक्ष देत नसल्याने शेतीचे नुकसान होत आहे़ यामुळे तालुक्यातील देळूब ( बु ) येथील शेतकरी नूरखान पठाण यांनी यंत्राच्या साहाय्याने पिकांना पाणी देण्याचा प्रयोग तीन वर्षांपासून करत असून तो यशस्वी झाला आहे़ त्यांच्याकडे वडिलोपार्जित ५० एकर जमीन असून प्रमुख पीक म्हणून काबुली चना व सोयाबीन असे पीक घेतात़ काबुली चना साठी सिंचनाचा स्रोत विहिरी आहेत़ परंतु वीज पुरवठा खंडित होत असल्याने त्यांनी ट्रॅक्टरवर वीज निर्मिती करून मोटार पंप सुरू केले आहे़
ट्रॅक्टरला डाइनोमा जोडून वीज निर्मिती करण्यात आली आहे़ ती वीज मोटार पंपाला जोडली गेली असून या विजेपासून तीन ते चार मोटार पंप सुरू करण्यात आली आहे़ या डाइनोमाची क्षमता जास्त प्रमाणात असल्याने तीन ते चार मोटार पंप एकाच वेळेस चालू असतात़ यासाठी सहा किटक्याट जोडावे लागते़ कारण इन पुट, आउट पुट असते़ तीन किटक्याट मध्ये वीज निर्मितीसाठी असतात़ तर दुसऱ्या तीन किटक्याटमधून मोटार पंपास वीज जोडणी करावी लागते़ या यंत्राच्या सहाय्याने तीन ते चार मोटार पंप सुरू करण्यात येते़ या यंत्रामुळे वीज पुरवठा खंडित झाला़ तरी शेतीसाठी पाणी देण्यासाठी या यंत्राचा वापर होतो.