ग्रासरुट इनोव्हेटर : अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्याने ट्रॅक्टरवर बनविले फवारणी यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:24 PM2018-11-15T12:24:33+5:302018-11-15T12:27:35+5:30
ग्रासरुट इनोव्हेटर : पार्डी येथील शेतकरी मुकुंद कवडे यांनी फवारणी यंत्र तयार केले आहे.
- युनूस मियाँ नदाफ (पार्डी, जि़नांदेड)
अर्धापूर तालुका बागायती शेतीसाठी प्रसिद्ध असून, भरपूर उत्पादन देणाऱ्या पिकांची लागवड करण्यात येते. मोठ्या प्रमाणात ऊस, हळद व केळीची लागवड करण्यात येते; परंतु आजच्या घडीला मोठ्या पिकाला लागणारा भरमसाठ खर्च करूनसुद्धा उत्पन्न कमी होत असल्याने शेतकरी मोठ्या पिकापासून दूर होत असून, लहान पिकाकडे शेतकरीवर्ग वळत आहे. त्यामुळे फुलशेती, पालेभाज्या, तुतीची शेती करीत आहेत. या पिकांसाठी औषधी फवारणी करण्यासाठी पाठीवरची फिचकारीचा वापर करण्यात येतो. मजूरदार किंवा शेतकऱ्यांना दिवसभर पाठीवर औषधी फवारणी करावी लागते.
त्यामुळे शेतकऱ्यांना विविध आजार उद्भवतात त्यामुळे पार्डी येथील शेतकरी मुकुंद कवडे यांनी फवारणी यंत्र तयार केले आहे. पाठीवर फवारणी यंत्र घेऊन पिकावर फवारणी करण्यापेक्षा वेगळे काही करण्याचे ठरविले. त्यांनी स्वत:च्या जवळ असलेल्या छोट्या टॅक्टरवर प्रयोग करून फवारणी यंत्र तयार केले आहे. या फवारणी यंत्राच्या साहाय्याने २५० ते ३०० फुटांपर्यंत फवारणी करण्यात येत आहे. या यंत्राचा वापर एका व्यक्तीच्या साह्याने करण्यात येतो, तसेच पाठीवर फवारणी यंत्र घेण्याची गरज नाही़ ट्रॅक्टर एका जागी उभे करून ३०० फुटांपर्यंत नळी नेऊन पिकावर फवारणी करता येते.
यंत्रामुळे वेळेची आणि कामगारांची बचत होते. या यंत्राच्या साहाय्याने ३०० फुटांपर्यंत फवारणी करण्यात येते. टँक्टरवर २०० लिटर पाण्याची टाकी ठेवण्यात आली आहे.
पाण्यासाठी मशीनचा वापर करण्यात आला आहे. पाणी पावर मशीनने ३०० फुटांपर्यंत फवारणी करण्यात येत आहे. टॅक्टरवरील यंत्राच्या साह्याने एका तासात दोन एकर क्षेत्रावरील पिकावर फवारणी केली जाते. एका तासासाठी एक लिटर डिझेल लागते. या यंत्राच्या साहाय्याने कामगार दिवसभर फवारणी करू शकतो.