कंधार तहसीलवर मातंग समाजाचा भव्य मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:12 PM2019-03-11T23:12:12+5:302019-03-11T23:12:33+5:30
गत काही वर्षापासून लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाला अनुसूचित जातीत वर्गीकरण करुन आरक्षण द्यावे यासाठी विविध सामाजिक संघटनेनी विविध आंदोलने केली. परंतु शासनाने कोणतीही दखल घेतली नाही.
कंधार : गत काही वर्षापासून लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाला अनुसूचित जातीत वर्गीकरण करुन आरक्षण द्यावे यासाठी विविध सामाजिक संघटनेनी विविध आंदोलने केली. परंतु शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. अखेर संजय ताकतोडे या तरूणाने आरक्षणासाठी जलसमाधी घेतली. संजयभाऊ ताकतोडे यांच्या कुटुंबाला एक कोटीची आर्थिक मदत द्यावी, त्यांच्या कुटुंबातील दोघांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे आदी मागण्यांसाठी ११ मार्च रोजी कंधार तहसील कार्यालयावर सकल मातंग समाजाचा वतीने विशाल मोर्चा काढण्यात आला. याला मोठा प्रतिसाद मिळाला.
११ मार्च रोजी सकल मातंग समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीचे वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण द्यावे. यासाठी विविध सामाजिक संघटनेनी अनेक आंदोलने, मेळावे, सत्याग्रह केले. लक्षवेधी हजारोंचे मोर्चे काढण्यात आले. तरीही शासनाने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे साळेगाव ता.केज जि.बीड येथील संजयभाऊ ताकतोडे या तरुणाने शासनाचा तीव्र निषेध करत ५ मार्च रोजी जलसमाधी घेतली. या घटनेने ताकतोडे कुटुंब उघड्यावर पडले. मातंग समाजाचा तरुण आरक्षणासाठी गमावला. या घटनेमुळे समाजात संताप व्यक्त केला जाऊ लागला. या घटनेला मुख्यमंत्री यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, ताकतोडे कुटुंबियांना एक कोटीची आर्थिक मदत द्यावी, कुटुंबातील दोन व्यक्तींना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या सर्व शिफारशीची तात्काळ अंमलबजावणी करावी, मुंबई विद्यापीठाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे, लहुजी साळवे यांचे पुणे येथे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारावे, साळेगाव येथे संजयभाऊ यांचे स्मारक उभारावे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला दोन हजार कोटींचे भांडवल उपलब्ध करून द्यावे आदी प्रमुख मागण्यांसाठी कंधार येथे सकल मातंग समाजाच्या वतीने विशाल मोर्चा काढण्यात आला होता. या सर्व मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार सारंग चव्हाण यांना देण्यात आले.
मोर्चा साठेनगर कंधार येथून मुख्य रस्त्याने निघून महामानवाच्या पुतळ्यास अभिवादन करत तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. सकल मातंग समाज कृती समिती आयोजित मोर्चात मारोती गायकवाड, महेंद्र कांबळे, साईनाथ मळगे, केदारनाथ देवकांबळे, मालोजी वाघमारे, हणमंत घोरपडे, बाबूराव टोम्पे, बालाजी कांबळे, बंटी गादेकर, मुन्ना बसवंते, चंद्रकांत गव्हाणे, महेश मोरे, बालाजी गायकवाड, कैलास बसवंते, शिवराज दाढेल, प्रदीप वाघमारे, वैजनाथ घोडजकर, सोपान कांबळे यांच्यासह सकल मातंग समाज कृती समितीचे सदस्य आणि मातंग समाज स्त्री-पुरूष मोठ्या संख्येने सहभागी होते.