शानदार ! जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी वायुदलाच्या पश्चिम विभागाच्या प्रमुखपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 07:19 PM2020-07-27T19:19:57+5:302020-07-27T19:20:34+5:30
एका छोट्या खेडेगावातून आलेला मुलगा आपल्या कर्तबगारीने कुठपर्यंत जाऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण होय.
हदगाव (जि़नांदेड) : तालुक्यातील हस्तरा येथील मूळचे विवेक चौधरी यांची भारताच्या पश्चिम विभागाचे वायुदल प्रमुख म्हणून निवड झाली़ १ आॅगस्टपासून ते आपला पदभार स्वीकारणार आहेत़ एका छोट्या खेडेगावातून आलेला मुलगा आपल्या कर्तबगारीने कुठपर्यंत जाऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण होय.
विवेक चौधरी यांचे प्राथमिक शिक्षण कोळी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले़ त्यांचे आजोबा कोळी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून होते. त्यानंतर ते नांदेडला स्थायिक झाले़ मार्शल चौधरी-पांडे यांचे कुटुंबीय सध्या हस्तरा या गावी राहत नसले तरी त्यांची वडिलोपार्जित शेती आहे़विवेक चौधरी हे डिसेंबर १९८२ मध्ये फायटर पायलट म्हणून वायुसेनेत दाखल झाले. मिग-२१, मिग-२९, सुखोई-३० अशा वायुदलाच्या विमानातील गगनभरारीचा त्यांना अनुभव आहे. ते एक अनुभवी पायलट असून ३८०० तासांपेक्षा जास्त विमान उडविण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. १९९९ च्या कारगिल मोहिमेत त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.
आपल्या शिवशेजारचा माणूस भारताच्या सीमा रक्षणाच्या मोहिमेत महत्त्वाची जबाबदारी स्वीकारतो, ही बाब हदगाव तालुका तसेच नांदेड जिल्ह्णासाठी आनंदाची असल्याची प्रतिक्रिया माजी आ़नागेश पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केली़