अवयवाविनाच ग्रीन कॉरिडॉर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:55 AM2019-06-23T00:55:44+5:302019-06-23T00:58:18+5:30

ग्लोबल हॉस्पिटलसमोर शुक्रवारी रात्री साडेदहानंतर नागरिकांची गर्दी होती. हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर वाहतूक शाखेचे पोलीस तैनात होते. दुसरीकडे ग्लोबल हॉस्पिटल ते विमानतळ या मार्गावर पोलीस व्हॅन सायरन वाजवित नागरिकांना सहकार्याचे आवाहन करीत होती.

The Green Corridor for doctors | अवयवाविनाच ग्रीन कॉरिडॉर

अवयवाविनाच ग्रीन कॉरिडॉर

Next
ठळक मुद्देरुग्णवाहिकेतून डॉक्टरांचाच प्रवास मध्यरात्री किडन्या औरंगाबादला केल्या रवाना

विशाल सोनटक्के।
नांदेड : ग्लोबल हॉस्पिटलसमोर शुक्रवारी रात्री साडेदहानंतर नागरिकांची गर्दी होती. हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर वाहतूक शाखेचे पोलीस तैनात होते. दुसरीकडे ग्लोबल हॉस्पिटल ते विमानतळ या मार्गावर पोलीस व्हॅन सायरन वाजवित नागरिकांना सहकार्याचे आवाहन करीत होती. रात्री १०.५६ च्या सुमारास पोलीस ताफ्यासह रुग्णवाहिका विमानतळाच्या दिशेने सुसाट सुटली आणि अवघ्या ४ मिनिटे १० सेकंदात ही रुग्णवाहिका विमानतळावर पोहोचलीही. मात्र शुक्रवारी रात्री पार पडलेला हा ग्रीन कॉरिडॉर अवयवाविनाच झाल्याचे पुढे आले आहे. या ग्रीन कॉरिडॉरचा वापर केवळ मुंबईहून आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांना विमानतळापर्यंत पोहोचविण्यासाठीच करण्यात आला.
अवयवदानाची चळवळ लोकाभिमुख होत असून नांदेडकरही या चळवळीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत़ यापूर्वी विष्णूपुरीतील शासकीय रुग्णालयातून सर्वात प्रथम सुधीर रावळकर या युवकाच्या अवयवदानासाठी ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला़ शासकीय रुग्णालय ते विमानतळ असे जवळपास पंधरा किमींचे अंतर अवघ्या १२ मिनिटांत पूर्ण केले. त्यानंतर आठच दिवसांत याच ठिकाणाहून दुसरा ग्रीन कॉरिडॉर झाला़ पुढे ग्लोबल हॉस्पिटलमधून तिसरा आणि चौथा ग्रीन कॉरिडॉर यशस्वीरीत्या पार पडला होता. त्यामुळे शुक्रवारच्या पाचव्या ग्रीन कॉरिडॉरकडे सर्वांचेच लक्ष होते. शुक्रवारी पहाटे जागतिक योगदिन होता. मुख्यमंत्र्यांसह योगगुरु रामदेवबाबा यांच्या उपस्थितीत तो आयोजित केला असल्याने पोलीस यंत्रणा मागील दोन दिवसांपासून योगाच्या कार्यक्रमात व्यस्त होती. मात्र त्यानंतरही ग्रीन कॉरिडॉरचे नियोजन झाल्यानंतर ही माहिती मिळताच अवघ्या काही क्षणात पोलीस यंत्रणा सतर्क होऊन रस्त्यावर उतरली. रात्री नऊच्या सुमारासच मुंबईहून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक नांदेडमध्ये दाखल झाले होते. ग्लोबल हॉस्पिटल ते विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस निरीक्षक वानोळे यांच्या नेतृत्वाखाली ३० कर्मचारी तैनात होते. दादाराव पवळे यांचे यकृत मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटलला पाठविण्यात येणार होते. रात्री १० वाजून ५६ मिनिटांनी ग्लोबल हॉस्पिटलमधून पोलीस ताफ्यासोबत रुग्णवाहिका निघाल्यानंतर यकृत घेऊनच ती निघाल्याचे पोलीस पथकांसह उपस्थितांनाही वाटले. मात्र शस्त्रक्रियेनंतर यकृत सुस्थितीत नसल्याचे डॉक्टरांना दिसून आले. त्यामुळे मुंबईला यकृत पाठविलेच नाही. दुसरीकडे हा कॉरिडॉर सुरु होता त्यावेळी दोन्ही किडण्याही ग्लोबल हॉस्पिटलमध्येच होत्या. या किडण्या कॉरिडॉर पार पडल्यानंतर सुमारे तीन तासांनी विशेष रुग्णवाहिकेद्वारे मध्यरात्री दोनच्या सुमारास औरंगाबादकडे पाठविण्यात आल्या. तर दोन्ही डोळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. म्हणजेच ग्रीन कॉरिडॉरचा वापर केवळ मुंबईच्या तज्ज्ञ डॉक्टरांना विमानतळापर्यंत सोडविण्यासाठीच झाल्याचे दिसून येते.
गरजू रुग्णांना मिळाले जीवदान
विश्वदीपनगर येथील रहिवासी तथा बीएसएनएलमध्ये मेकॅनिक म्हणून कार्यरत असलेले दादाराव नागोराव पवळे (वय ६२) यांना ब्रेन हॅमरेज झाल्याने ग्लोबल हॉस्पिटल येथे गुरूवारी दाखल करण्यात आले होते़ पवळे यांच्या मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता़ त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केले़ दरम्यान, डॉक्टरांनी पवळे यांच्या पत्नी आणि मुलांना अवयवदानाविषयी माहिती दिली़ यावर कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता पवळे कुटुंबियांनी अवयवदान करण्यास होकार दिला़ त्यानंतर पुढील प्रक्रियेला सुरूवात केली़ मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटल तसेच औरंगाबाद येथील डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना माहिती देण्यात आली़ शुक्रवारी दिवसभरामध्ये अवयवदान करण्यासाठी लागणारी सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेण्यात आली़ पवळे यांच्या अवयवदानामुळे दोन किडण्या आणि दोन डोळे गरजूंना मिळाले. एक प्रकारे त्यांनी या रुग्णांना जीवदानच दिले आहे. मयत दादाराव पवळे यांच्या पश्चात पत्नी लक्ष्मीबाई पवळे, मुलगा नामदेव पवळे, सिद्धार्थ पवळे, मुलगी पद्मिनी सांडुले, मीना पवळे असा परिवार आहे़

दादाराव पवळे यांना ब्रेन हॅमरेज झाल्याने गुरुवारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते़ त्यांना ब्रेन डेड घोषित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अवयवदानास होकार दिला़ यकृत मुंबईला खास विमानाद्वारे पाठविण्यात येणार होते़ मात्र शस्त्रक्रियेनंतर यकृत सुस्थितीत नसल्याचे आढळले. त्यामुळे ते मुंबईला पाठविता आले नाही़ मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास दोन किडन्या ग्लोबल हॉस्पिटलमधून रुग्णवाहिकेद्वारे औरंगाबादला पाठविण्यात आल्या़
- डॉ़ त्र्यंबक दापकेकर,
ग्लोबल हॉस्पिटल, नांदेड

Web Title: The Green Corridor for doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.