नामांतर दिनानिमित्त शहिदांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:15 AM2021-01-15T04:15:35+5:302021-01-15T04:15:35+5:30
नामांतर दिनानिमित्त शहिदांना अभिवादन करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात ...
नामांतर दिनानिमित्त शहिदांना अभिवादन करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. औरंगाबाद विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी १६ वर्षे चाललेल्या संघर्षाला १९९४ मध्ये यश मिळाले. नामांतर लढ्यात नांदेड जिल्ह्यातील पोचीराम कांबळे, जनार्दन मवाडे, गौतम वाघमारे हे शहीद झाले. नामांतर लढ्यात शहीद झालेल्या भीमवीरांना अभिवादन करण्यासाठी १४ जानेवारी रोजी महात्मा फुले पुतळ्यासमोर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रा. देवीदास मनोहरे, पी. एस. गवळे, जे. डी. कवडे, बबीताताई पोटफोडे, नंदकुमार बनसोड, रवी गायकवाड, राजेश रापते, विजय गोडबोले, ॲड. मधुकर टेळकीकर, ॲड. बादलगावकर, शिलरत्न चावरे, भगवान गायकवाड, बालाजी मोरे, दत्ताहरी धोत्रे, विकास इंगोले, कपिल वाबळे, प्रबुद्ध चित्ते, गब्बर सोनवणे, धम्मानंद गजभारे, व्यंकट इंगोले यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर शहिदांना अभिवादन करण्यापूर्वी महात्मा फुले आणि सावित्रीआई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. गायकवाड म्हणाले, आंबेडकरी चळवळीने नामांतराचा लढा अत्यंत प्रखरपणे लढला. अन्याय, अत्याचाराविरुद्ध बंड करून उठलेल्या चळवळीने हा लढा जिंकला खरा, मात्र आंबेडकरी चळवळीला राजकीय संघर्ष आजपर्यंत स्वतंत्रपणे जिंकता आला नाही. आजही शैक्षणिक, सामाजिक, असंख्य प्रश्न आहेत. शैक्षणिक, सामाजिक, गायरान अशा विविध प्रश्नांवर आंबेडकरी आंदोलने उभारताना समाज एकत्र येतो, मात्र राजकारणात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी समाज एकत्र येत नाही, त्यामुळे आजचा युवक सैरभैर झाला आहे. दरम्यान, शहीद पोचीराम कांबळे यांची सून जयश्री बाबू कांबळे आणि शहीद चंदर कांबळे यांची कन्या मीनाताई यांचा सन्मान करण्यात आला.