नांदेड क्लबमध्ये सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:14 AM2021-07-16T04:14:09+5:302021-07-16T04:14:09+5:30
खेळाडूंनी अर्ज सादर करावेत नांदेड - केंद्र शासनाच्या आयकर विभागात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी आणि प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी विविध ...
खेळाडूंनी अर्ज सादर करावेत
नांदेड - केंद्र शासनाच्या आयकर विभागात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी आणि प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी विविध पदांच्या खेळाडू भरतीचा कार्यक्रम जाहीर झाला. यामध्ये जलतरण, बुद्धीबळ, कॅरम, बॅडमिंटन, लॉनटेनिस, टेबल टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट आदी खेळामध्ये राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून सहभाग अथवा प्रावीण्य मिळविलेले खेळाडू भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. इच्छुकांनी कामगिरी प्रमाणित करून घेण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे २० ऑगस्ट पूर्वी कार्यालयीन वेळेत प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मारावार यांनी केले आहे.
राष्ट्रीय विरोध दिन
नांदेड - अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने १५ जुलै रोजी देशव्यापी राष्ट्रीय विरोध दिन पाळून काळ्या फिती लावून सरकारच्या कर्मचारी विरोधी दिनाचा निषेध केला. या संदर्भातील निवेदन पंतप्रधानांना पाठवण्यात आले. निवेदनावर अध्यक्ष लक्ष्मण नारमवार, कार्याध्यक्ष श्रीराम पाटील, कोषाध्यक्ष गिरीश येवते, सरचिटणीस वसंत जारीकोटे, कार्यालयीन सचिव लक्ष्मण जाधव, उपाध्यक्ष सतीश पवार, सल्लागार ना.रा. जाधव, डी. पी. झगडे यांच्या सह्या आहेत.
ग्रंथालयाच्या अनुदानासाठी उपोषण
नांदेड - राज्यातील १२ हजारांच्या वर सार्वजनिक वाचनालय गेल्या वर्षभरापासून अनुदान अभावी बंद पडले आहेत. त्यामुळे अल्प मानधनावर काम करणारे हजारो ग्रंथपाल उपाशीपोटी आहेत. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आषाढी एकादशी पासून (२० जुलै) उपोषणास बसण्याचा निर्णय माजी आ. ॲड. गंगाधर पटणे यांनी घेतला आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रंथपाल व जिल्ह्यातील ८०० पैकी अनेक ग्रंथालयीन कर्मचारी उपोषणास बसणार आहेत.
प्रदेश उपाध्यक्षपदी साठे
मुखेड - भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी मुखेडचे माधवराव साठे यांची निवड झाली. प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी ही निवड जाहीर केली. या निवडीबद्दल त्यांचे अनेकांनी स्वागत केले.
आजपासून पंचनामे सुरू
देगलूर - मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे १५ जुलैपासून पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी दिली. खानापूर सर्कलमध्ये येणाऱ्या सुगाव, वझरगाव गावच्या शिवारातून वाहणाऱ्या आणि देगलूर-नांदेड महामार्गाला ओलांडणाऱ्या ओढ्याला मोठा पूर आला होता. पुराचे पाणी शेतात शिरूर शेत जलमय झाल्याने मोठे नुकसान झाले होते.
मुदतवाढ देण्याची मागणी
नायगाव - पीकविमा भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गजानन पाटील होटाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यंदा पीक विम्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. पीककर्जाचे नूतनीकरण, बी-बियाणाची महागाई, पावसाची दडी यामुळे मधल्या काळात शेतकरी अडचणीत होते. त्यामुळे विमा रक्कम भरू शकत नसल्याने मुदतवाढ देण्यात यावी असेही होटाळकर यांनी नमूद केले.
स्मारक बांधण्याचा ठराव
कंधार - पंचायत समिती परिसरात हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे स्मारक उभे करण्याचा ठराव मंगळवारी पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. हा ठराव पं.स. सदस्य उत्तम चव्हाण यांनी मांडला. सुधाकर सूर्यवंशी यांनी त्याला अनुमोदन दिले.
१० हजारांची दारू जप्त
हदगाव - हदगाव तालुक्यातील वाळकी फाटा येथे एका हॉटेलवर छापा टाकून पोलिसांनी मनोहर स्वामी (रा. वाळकी बु.) व अमोल राऊत (रा. ल्याहरी) यांच्याकडून ८ हजार ८०० रुपयांची अवैध दारू जप्त केली. आरोपीविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला.
उपसरपंचाची निवड रद्द
भोकर - सावरगाव माळ येथील उपसरपंच शिवाजी कोलटकर यांची निवड जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द ठरवली. या पदासाठी कोलटकर व गोदावरी सावळे यांनी अर्ज दाखल केले होते. त्यात सावळे यांचा अर्ज अवैध ठरला. मात्र नामनिर्देशन पत्रावर कुठलाही वैध-अवैध याबाबत नमूद केले नव्हते. उपसरपंच पदावर कोलटकर यांची निवड जाहीर करण्यात आली. या बाबीला सावळे यांनी आक्षेप घेतला होता.
तहसीलदारांची भेट
मांडवी - तहसीलदार उत्तम कागणे यांनी भिलगाव येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. यावेळी मंडळ अधिकारी मोईन शेख, तलाठी के.बी. रेणके, सरपंच कुंडलिक पुसनाके, अर्जुन जाधव, केशव आडे, मोहन आडे, रवींद्र कुंभारे, नामदेव पेंदोर, राधाबाई सलाम आदी उपस्थित होते.
विवाहितेची आत्महत्या
किनवट - पतीशी झालेल्या भांडणानंतर विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना मौजे हुंडी येथे घडली. पार्वतीबाई खोकले असे मयत विवाहितेचे नाव आहे. पतीशी वादावादी हाेत असल्याने ती माहेरी हुंडी येथे राहत होती. यातूनच तिने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. इस्लापूर पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद घेतली.
ललिता कुंभार यांची नियुक्ती
नांदेड - सामाजिक कार्यकर्त्या ललिता कुंभार यांची अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटनेच्या नांदेड शहर महिलाध्यक्षा म्हणून निवड झाली. त्या विश्वासू प्रवासी संघटनेच्या उपाध्यक्षा ही आहेत. या निवडीचे अनेकांनी स्वागत केले.
सिंदखेड पोलिसांची कारवाई
माहूर - सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुटखा, मटका, देशी दारू विक्री विरूद्ध पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली. या अंतर्गत अनेकांवर गुन्हे नोंदवण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
तिबार पेरणीचे संकट
कंधार - तालुक्यातील उस्माननगर परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट आले. जमिनीत पाणी भरपूर असल्याने कापूस पिकाच्या चुका वाढल्या. दोन बॅगला एक बॅग या प्रमाणात चुका आहे. याशिवाय यंदा सोयाबीनचे उत्पादन घेण्यासाठी कल वाढला आहे. उगवण होणार नाही अशा पावसाने शेतकरी हतबल झाले आहेत. नाल्यांच्या कडेने शेतातील पिकांचे नुकसान झाले. ओढे ही दुथडी भरून वाहत आहेत.
लसीकरणासाठी गर्दी
कंधार- उस्माननगर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. लस घेण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे. पावसामुळे अनेकांना दवाखान्यातच थांबावे लागले. वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश किरवले यांनी १० चे गट करून नियोजन केल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले.
अविश्वास ठराव बारगळला
सारखणी - सारखणी येथील महिला सरपंच यांच्याविराेधातील अविश्वास ठराव बारगळला आहे. या अनुषंगाने तलाठी यांच्याकडून सर्व सदस्यांना नोटिसीद्वारे कळविण्यात आले होते. मात्र तहसीलदार यांच्या विशेष सभेत ९ पैकी ७ मतदान झाले. यात महिला सरपंच तोडसाम यांचा विजय होऊन अविश्वास ठराव बारगळला.