राज्यराणी एक्स्प्रेसच्या उद्घाटनाला पालकमंत्री चव्हाणांसह खासदार पाटील यांना डावलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 06:15 PM2020-01-10T18:15:46+5:302020-01-10T18:22:13+5:30
शिवसैनिकांनी रेल्वेच्या डीआरएम कार्यालयासमोर आंदोलन करीत निषेध नोंदविला़
- श्रीनिवास भोसले
नांदेड : नांदेड- मुंबई राज्यराणी एक्स्प्रेसचे आज नांदेडचे खा़प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे़ परंतु, या कार्यक्रमाला पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना डावलल्याने सदर कार्यक्रमाला राजकीय झालर चढली असल्याचे बोलले जात आहे़ दरम्यान, शिवसैनिकांनी रेल्वेच्या डीआरएम कार्यालयासमोर आंदोलन करीत निषेध नोंदविला़
नांदेड येथून मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसाठी मराठवाड्यातील खासदार आणि रेल्वे प्रवाशी संघटनांकडून रेल्वे प्रशासनावर दबाव येत असल्याने रेल्वे बोर्डाने राज्यराणी एक्स्प्रेस नांदेडपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला़ सदर रेल्वे नांदेडला नेण्याच्या निर्णयावर मनमाड, नाशिक येथील खासदारांसह रेल्वे प्रवाशांनी विरोध दर्शविला आहे़ परंतु, त्यात रेल्वे बोर्डाने मनमाडसाठी स्वतंत्र डब्बे देत नाशिक, मनमाडकरांचा विरोध थंड केला़ दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील खासदारांशी यासंदर्भात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनीही चर्चा केली होती़
दरम्यान, राज्यराणी एक्स्प्रेसचे शुक्रवारी खा़प्रतापराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे़ या कार्यक्रमाचे निमंत्रण स्थानिक आमदार बालाजी कल्याणकर, आ़मोहनअण्णा हंबर्डे यांच्यासह महापौर आणि इतर लोकप्रतिनिधींना देण्यात आले आहे़ परंतु, नांदेडच्या विकासात महत्वपूर्ण योगदान असणाऱ्या आणि जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना या कार्यक्रमापासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे़ त्यांना निमंत्रित केले असते तर राजकीय शिष्टाचारानूसार पालकमंत्री म्हणून त्यांच्या हस्ते उद्घाटन करावे लागले असते़ त्यामुळे निमंत्रणच न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले़
आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वात आंदोलन
खासदार हेमंत पाटील यांना जाणीवपूर्वक निमंत्रण दिले नसल्याचा आरोप करीत आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वात रेल्वेच्या विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले़ यावेळी हातात काळे झेंडे घेवून जोरदार घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी निषेध नोंदविला़ यावेळी महानगरप्रमुख अशोक उमरेकर, सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार, निकिता शहापुरकर, तुलजेश यादव आदी उपस्थित होते़ सदर कार्यक्रमाचे आपल्याला निमंत्रण आहे़ परंतु, आमचे नेते तथा हिंगोलीचे खा़हेमंत पाटील यांना डावलल्याने आपण सदर कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे आ़बालाजी कल्याणकर यांनी सांगितले़
श्रेयासाठी काम करीत नाही-हेमंत पाटील
राज्यराणी एक्स्प्रेसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे़ आज प्रत्यक्षात सदर गाडी सुरू होत असल्याचा आनंद आहे़ सदर गाडीसाठी कोणी काय पाठपुरावा केला हे सांगण्याची गरज नाही़ आम्ही शिवसैनिक श्रेयासाठी काम करीत नाही़ परंतु, रेल्वे बोर्डाने एखाद्या लोकप्रतिनिधींच्या दबावाला बळी पडून कार्यक्रमाचे नियोजन करू नये़ हिंगोलीचा खासदार या नात्याने निमंत्रण द्यायला पाहिजे होते, अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत म्हणून त्यांनी आंदोलन केले़ परंतु, श्रेयापेक्षा जनतेचे प्रश्न सुटणे गरजेचे आहे़ हिंगोलीसह नांदेडच्या अनेक मागण्या रेल्वे प्रशासनाकडे प्रलंबित असून त्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे, अशी प्रतिक्रिया हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी दिली़
आजपासून धावणार राज्यराणी एक्स्प्रेस
रेल्वे बोर्डाने गाडी संख्या २२१०१/२२१०२ मनमाड- मुंबई सी.एस.एम.टी. - मनमाड राज्यराणी एक्स्प्रेसला श्री हुजूर साहिब नांदेड रेल्वेस्थानका पर्यंत वाढविण्यास मंजुरी दिली आहे. या गाडीला १७६११/१७६१२ हा नवीन नंबर दिला असून हुजूर साहिब नांदेड-मुंबई सी.एस.एम.टी.- हुजूर साहिब नांदेड अशी धावेल. सदर गाडी शुक्रवारी रात्री १० वाजता नियमितपणे हुजुर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि मुंबई सी.एस.एम.टी. येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०़०७ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी संख्या १७६१२ मुंबई सी.एस.एम.टी. ते नांदेड एक्स्प्रेस मुंबई रेल्वे स्थानकावरून ११ जानेवारीपासून नियमित सायंकाळी ६़ ५० वाजता सुटेल आणि नांदेड रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ७़२० वाजता पोहोचेल. या गाडीस १७ डब्बे असतील. राज्यराणी एक्स्प्रेस आपल्या प्रवासात पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, मनमाड, नाशिक रोड, देवळाली, इगतपुरी, कसारा, कल्याण ज., ठाणे रेल्वे स्थानकावर थांबेल.