नांदेडच्या दुष्काळाचा आढावा पालकमंत्री घेणार आता मुंबईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 11:52 PM2019-05-26T23:52:27+5:302019-05-26T23:54:01+5:30
एकीकडे दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्याचवेळी आता मान्सूनही लांबल्याने पाणीटंचाईचा प्रश्न जिल्ह्यात ऐरणीवर आला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात बैठका घेवून उपाययोजना करण्याची गरज असताना पालकमंत्री रामदास कदम यांनी आता मुंबईत बैठक बोलावली असून नांदेडच्या दुष्काळाचा आढावा तिथे घेतला जाणार आहे.
नांदेड : एकीकडे दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्याचवेळी आता मान्सूनही लांबल्याने पाणीटंचाईचा प्रश्न जिल्ह्यात ऐरणीवर आला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात बैठका घेवून उपाययोजना करण्याची गरज असताना पालकमंत्री रामदास कदम यांनी आता मुंबईत बैठक बोलावली असून नांदेडच्यादुष्काळाचा आढावा तिथे घेतला जाणार आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या. जिल्ह्याचे पालकसचिव आणि पालकमंत्र्यांनी थेट जिल्ह्यात जावून पाहणी करुन दुष्काळाचा आढावा घ्यावा, असेही नमूद करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्याचे पालकसचिव एकनाथ डवले यांनी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. काही दुष्काळी भागातही त्यांनी पाहणी केली. तसेच प्रशासकीय पातळीवरही आढावा घेतला.
पालकमंत्री रामदास कदम यांचाही दौरा २७ मे रोजी नियोजित होता. नांदेडमध्ये ते दुष्काळी परिस्थितीचा आढावा तसेच जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व तयारीचा आढावा घेणार होते. मात्र आता ऐनवेळी त्यांचा नांदेड दौरा रद्द झाला आहे.
जिल्हा दुष्काळासंदर्भातील बैठक आता २७ ऐवजी २८ मे रोजी नांदेड ऐवजी मुंबई येथे मंत्रालयात घेतली जाणार आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे.
एकूणच जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना पालकमंत्र्यांनी स्वत: जिल्ह्यात दुष्काळी भागांना भेटी देवून पाहणी करणे तसेच दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनाच्या संदर्भात प्रशासनाला आदेशित करणे आवश्यक आहे. मात्र असे न होता पालकमंत्र्यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती सोडून २८ मे रोजी अधिका-यांना मुंबईला जावे लागणार आहे.
या बैठकीसाठी २७ मे रोजीच जिल्हाधिकारी, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, जि.प.चे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यासह दुष्काळी तालुके असलेल्या देगलूर, मुखेड तसेच लोहा आणि नांदेड तहसीलदारांनाही मुंबईकडे रवाना व्हावे लागणार आहे.
शेतक-यांची चिंता वाढली, नांदेड शहरही तहानलेलेच
राज्यात यंदा मान्सूनचे आगमन उशिरा होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांची वर्तवला आहे. ८ जूनपर्यंत तरी मान्सूनपूर्वीचा पाऊस राज्यात होणार नाही. त्यामुळे तापमानाचा पारा वाढताच राहणार आहे. याचा फटका पाणी टंचाई असलेल्या भागांना बसणार आहे. नांदेड शहराला पाणीपुरवठा करणारा विष्णूपुरी प्रकल्प कोरडा पडला आहे.