नांदेड मनपाच्या प्रस्तावांना पालकमंत्र्यांची कात्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:06 AM2018-04-25T01:06:30+5:302018-04-25T01:06:30+5:30
महापालिकेच्या दलित वस्ती निधीअंतर्गत २०१७-१८ च्या ७० कामांना प्रशासकीय मंजुरी देताना शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांना पालकमंत्र्यांकडूनच हरताळ फासला असून मनपाने प्रस्तावित केलेले कामे रद्द करुन प्रस्ताव नसलेली २१ कामांचे आदेश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेच्या दलित वस्ती निधीअंतर्गत २०१७-१८ च्या ७० कामांना प्रशासकीय मंजुरी देताना शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांना पालकमंत्र्यांकडूनच हरताळ फासला असून मनपाने प्रस्तावित केलेले कामे रद्द करुन प्रस्ताव नसलेली २१ कामांचे आदेश दिले आहेत.
महापालिकेने २०१७-१८ च्या दलित वस्ती निधीअंतर्गत १५ कोटी ७९ लाख रुपयांच्या कामाचे ६५ प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविले होते. यामध्ये महापालिकेने ६४ कामे सुचवली होती. या कामांना मंजुरी दिल्याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी १९ एप्रिल २०१८ रोजी महापालिका आयुक्तांना पाठविले. मात्र ही प्रशासकीय मान्यता देताना महापालिकेने प्रस्तावित केलेल्या ६४ कामांपैकी १७ कामे रद्द केली आहेत. तर दुसरीकडे पालकमंत्र्यांनीच नवीन २१ कामे सुचवली असून यात बहुतांश कामे ही समाजमंदिर बांधकामाचे आहेत. तसेच पालकमंत्र्यांनी रद्द केलेल्या कामामध्ये सिडकोच्या मुख्य रस्त्याचे तब्बल २ कोटींचे कामही रद्द केले आहे. त्याचवेळी शहरातील जयभीमनगर ही पूर्णत: दलित वस्ती असल्याने या प्रभागातील अंतर्गत रस्ते, नाल्या तसेच ड्रेनेजलाईनची ५५ लाखांची कामे आहेत. तसेच भीमवाडी या नवीन नांदेडातील वस्तीतील २३ लाखांचे कामेही रद्द केली़ प्रभाग क्र. १३ मध्ये शांतीनगर, विणकर कॉलनी हे पूर्णत: मागास भाग असल्यामुळे जवळपास ५० लाखांची कामे मनपा सभागृहाने या प्रभागात सुचवली होती. मात्र त्या कामांनाही कात्री लावण्यात आली आहे. तर गोकुळनगर भागातही सुचवलेले ७६ लाखांचे काम रद्द केले आहे. पालकमंत्र्यांनी नव्याने सुचवलेल्या २१ कामांमध्ये जवळपास १० कामे समाजमंदिर बांधकाम व दुरुस्तीचे आहेत तर काही कामे सीसी रस्ता व नाल्यांची आहेत. पालकमंत्र्यांनी सुचवलेल्या २१ कामांचा महापालिकेच्या प्रस्तावात आणि ठरावामध्ये समावेश नाही. तसेच या २१ कामांसंदर्भात समाजकल्याण अधिका-यांचा स्थळ- पाहणी अहवाल नसल्याचे जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले़ त्यामुळे पालकमंत्र्यांनी सुचवल्याप्रमाणे नवीन प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.
महापालिकेने प्रस्तावित केलेली कामे रद्द करणे ही बाब चुकीची असल्याचे सभागृहनेते वीरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी सांगितले. प्रस्ताव नसतानाही नवीन कामे आली कशी? मनपाच्या प्रस्तावाविना कामे घेण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना आहेत काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्याच वेळी नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. मनपा सभागृह त्याला तीव्र विरोध करेल, असेही गाडीवाले म्हणाले़
कामे सुचवण्याचे अधिकार हे महापालिका सभागृहाचेच आहेत. पालकमंत्र्यांना त्यात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही. केवळ काम कुणी करायचे? सार्वजनिक बांधकाम विभागाने करायचे की महापालिकेने करायचे? हा निर्णय पालकमंत्री घेऊ शकतात. कामे सुचवण्याचे सर्व अधिकार महापौर आणि सभागृहाचे आहेत. या अधिकारावर गदा येत असेल तर न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असे माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांनी दिले उत्तर - नांदेडला प्राधान्य
दलित वस्ती निधीअंतर्गत पालकमंत्र्यांनी रद्द केलेल्या कामांमध्ये सिडकोच्या प्रमुख रस्त्याचाही समावेश आहे. दोन कोटी रुपयांचे हे काम रद्द केले आहे. त्यासह प्रभाग २० मधील २, प्रभाग १९ मधील दोन तसेच प्रभाग १३ मधील दोन कामांचाही समावेश आहे. दक्षिण नांदेडातील ही कामे रद्द करताना पालकमंत्र्यांनी सुचवलेली कामे ही पूर्णत: उत्तर नांदेड मतदारसंघातील आहेत. केवळ एक काम वगळता प्रभाग १, २, ३ आणि प्रभाग ९ मध्ये पालकमंत्र्यांनी नवीन कामे सुचवली आहेत.