उघड्या डीपीने घेतला सालगड्याचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:52 AM2019-03-23T00:52:06+5:302019-03-23T00:53:26+5:30
तालुक्यातील बरडशेवाळा येथील उघड्या डीपीचा धक्का बसून सालगड्याचा मृत्यू झाल्याची घटना २० मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. घटनेनंतर मयताच्या कुंटुबियाप्रति सहानुभूती दाखविण्याऐवजी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ‘मयत फ्यूज टाकण्यासाठी का गेला?’ असा उफराटा सवाल करुन नातेवाईकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
हदगाव : तालुक्यातील बरडशेवाळा येथील उघड्या डीपीचा धक्का बसून सालगड्याचा मृत्यू झाल्याची घटना २० मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. घटनेनंतर मयताच्या कुंटुबियाप्रति सहानुभूती दाखविण्याऐवजी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ‘मयत फ्यूज टाकण्यासाठी का गेला?’ असा उफराटा सवाल करुन नातेवाईकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिल्याने तणाव वाढला. दरम्यान, पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मयतावर अंत्यसंस्कार केले.
मयत राम विठ्ठलअप्पा रणखांब (वय ३७) हे हनुमान नाईक यांच्या शेतात सालगडी म्हणून कामाला होते. १९ मार्च रोजी रात्री शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी उठले, मात्र त्यावेळी शेतातील वीज गेली असल्याने ते डीपीकडे गेले. डीपीतील फ्यूज टाकत असताना विजेचा तीव्र धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २० मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. ही घटना समजताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेवून महावितरणच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मयताच्या कुटुंबियांना सहानुभूती दाखविणे तर दूर राहिले, ते डीपीकडे कशाला गेले? फ्यूज टाकण्यासाठी कोणाची परवानगी घेतली? असे उफराटे सवाल महावितरणच्या संबंधितांनी केल्याने नातेवाईक भडकले व त्यांनी राडा करुन प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला.
घटनेची माहिती मिळताच मनाठा पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करुन नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर बरडशेवाळा येथील प्रा.आ. केंद्रात मयताचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले. दरम्यान, यावेळी उपस्थित डॉक्टरांनी दुसरा वैद्यकीय अधिकारी नसल्याने सांगून उत्तरीय तपासणी करण्यास नकार दिल्याने नातेवाईक पुन्हा भडकले. तीन ते चार तास प्रेत तसेच पडून होते. नंतर हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात येवून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. २० मार्च रोजी सायंकाळी मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
महावितरणचे ३३ केव्ही केंद्र बरडशेवाळा येथे आहे़ बरडशेवाळा येथे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने शेतातील डीपी, लोंबकळलेल्या वीजतारा, कालबाह्य झालेल्या डीपी यांची दुरुस्ती करण्याचे काम गावातील जाणकार मंडळी आपापल्या परिने करतात़ नादुरुस्त झालेले साहित्य या शेतकºयांना वेळेवर कधीच मिळत नाही़