गुरुद्वारा बोर्डाचा १०४ कोटींचा अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 12:31 AM2019-03-01T00:31:49+5:302019-03-01T00:32:20+5:30
येथील श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डाचा १०४ कोटींचा अर्थसंकल्प व्यवस्थापन समितीने मंजुरीसाठी गुरुद्वारा बोर्डापुढे सादर केला आहे. ३१ मार्चपूर्वी बोर्डाच्या बैठकीत या अर्थसंकल्पाला मंजुरी घ्यावी लागणार असल्याचे गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरुविंदरसिंघ वाधवा यांनी सांगितले.
नांदेड : येथील श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डाचा १०४ कोटींचा अर्थसंकल्प व्यवस्थापन समितीने मंजुरीसाठी गुरुद्वारा बोर्डापुढे सादर केला आहे. ३१ मार्चपूर्वी बोर्डाच्या बैठकीत या अर्थसंकल्पाला मंजुरी घ्यावी लागणार असल्याचे गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरुविंदरसिंघ वाधवा यांनी सांगितले.
व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी व्यवस्थापन समितीची अर्थसंकल्पीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रारंभी पुलवामा येथे झालेल्या दशहतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीत गुरुद्वारा सचखंड बोर्डाचा २०१९-२० चा प्रस्तावित १०४ कोटींचा अर्थसंकल्प बैठकीत ठेवण्यात आला. यठा अर्थसंकल्पावर चर्चा करताना स. नवनिहालसिंघ जहागीरदार यांनी गुरुद्वारा बोर्डाचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी व्यापारी संकुल, फंक्शन हॉल, यात्रीनिवास आदींचे निर्माण करावे, अशी सूचना केली. यासाठी आराखडा तयार करण्याची जबाबदारी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांकडे सोपवावी, असेही ते म्हणाले. स. गुलाबसिंघ, स. रवींद्रसिंघ यांनीही या चर्चेत सहभाग घेताना गुरुद्वारा बोर्डाकडून अन्नधान्यासाठी वेअर हाऊस, वाशिंग प्रोजेक्ट व सोलार प्रोजेक्ट लवकर सुरु करुन बोर्डाच्या खर्चात कपात करावी, अशी सूचना केली. यानंतर गुरुद्वारा बोर्डाच्या प्रस्तावित १०४ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास व्यवस्थापन समितीने मान्यता दिली.हा अर्थसंकल्प आता गुरुद्वारा बोर्डाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. ३१ मार्चपूर्वी हा अर्थसंकल्प मंजूर करावा लागणार आहे.
या बैठकीस व्यवस्थापन समितीचे सदस्य गुलाबसिंघ कंधारवाले, स. ठाणसिंघ बुंगई, रवींद्रसिंघ बुंगई, नवनिहालसिंघ जहागिदार, गुरुविंदरसिंघ वाधवा आदींची उपस्थिती होती. या बैठकीत उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांचा बदलीनिमित्त आणि गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे सदस्य स. रवींद्रसिंघ बुंगई बोर्डाच्या निवडणुकीत निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
रेल्वेमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव
रेल्वे विभागाच्या वतीने नुकतीच नांदेड-देगलूर-बीदर या रेल्वे मार्गास मंजुरी मिळाली आहे. तसेच नांदेड-बीदर हा राष्टÑीय महामार्गामध्ये समाविष्ट करुन तो मंजूर करण्यात आला आहे. या दोन्हीही मार्गाचा शीख यात्रेकरुंना लाभ होणार आहे. बीदर येथील गुरुद्वारा नानकझिरा साहिब येथे हजारो भाविक दर्शनासाठी नांदेडहून ये-जा करीत असतात. या निर्णयाचे गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने स्वागत करण्यात आले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल व राष्ट्रीय रस्ते महामार्ग परियोजना मंत्री नितीन गडकरी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव घेण्यात आला.