२५ हजारांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:11 AM2021-03-29T04:11:59+5:302021-03-29T04:11:59+5:30
पाटोद्याची वीज सुरू मांडवी : महावितरणने पाटोदा बु. येथील पाणी पुरवठ्याची वीज खंडित केली होती. दरम्यान, याबाबत प्रहार संघटनेने ...
पाटोद्याची वीज सुरू
मांडवी : महावितरणने पाटोदा बु. येथील पाणी पुरवठ्याची वीज खंडित केली होती. दरम्यान, याबाबत प्रहार संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानंतर वीज पुन्हा सुरू करण्यात आली. तालुकाध्यक्ष मधुकर शेंडे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने सहायक जिल्हाधिकारी पुजार यांना निवेदन देऊन वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती.
रेणुकाचार्य यांची जयंती
अर्धापूर : वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक श्री श्री १००८ जगद्गुरू रेणुकाचार्य यांची जयंती लोणी येथे साजरी करण्यात आली. यावेळी संतोष गोदरे, मारोती गोदरे, सुरेखा गोदरे, कैलास भुसे, पुंडलिक भुसे, सुभाष भुसे, दत्ता भुसे, शिवदत्त कापसे, संतोष पत्रे, विश्वनाथ काटेकर, भगवान भुसे, शांता बुटले, इंदूबाई लासीनकर आदी उपस्थित होते.
विवाहितेचा छळ
कंधार : माहेराहून १ लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना सावळेश्वर ता. कंधार येथे घडली. २०१४ मध्ये विवाहितेच्या पतीने दुसरे लग्नही केले. या प्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
कामठा खु. येथे लसीकरण
कामठा खु. : येथील शासकीय उपकेंद्रात २७ मार्च रोजी कोविड लसीकरणाला सुरुवात झाली. पहिली लस पं.स. सदस्य प्रभू पाटील इंगळे यांनी घेतली. यावेळी संबंधित डॉक्टर, त्यांची टीम श्याम वानखेडे, बाबुराव उबाळे आदी उपस्थित होते.
महिलेचा आत्मदहनाचा इशारा
माहूर : महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना २०१९ मध्ये नाव आलेले असताना केवळ आधार प्रमाणीकरण होत नसल्यामुळे कमलबाई ठाकरे या कर्जमाफीपासून वंचित आहेत. कर्जमाफी न झाल्यास १५ एप्रिलपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिला. अर्ज, विनंत्या करूनही कर्जमाफी मिळत नसल्याने आपल्याला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले.
वाचनालयाचा उपयोग होईना
बोधडी : मंडळ कृषी अधिकारी कार्यालय बोधडी अंतर्गत इंजेगाव, सुंगागुडा, सिंगारवाडी, पाटोदा, देवलानाईक तांडा येथे एकात्मिक पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत कृषी वाचनालय सुरू करण्यात आले होते. आज या वाचनालयाचा बोजवारा उडाला. या वाचनालयाचा नागरिकांना कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही. सर्व साहित्य धूळ खात पडले आहे.
जनावरांचे आरोग्य धोक्यात
कुंटूर : जय अंबिका सहकारी साखर कारखान्यातील दूषित व मळीचे घाण पाणी साठवण तलावामध्ये सोडल्याने पाण्याला दुर्गंधी सुटली. माशा मृत झाल्या. जनावरांच्या पाण्यालाही दुर्गंधी येत आहे. रसायनयुक्त पाणी प्रक्रिया न करता ते तलावात सोडून देण्यात येत असल्याने जलसाठे दूषित होत आहेत. एकूणच या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.
कौठा येथे लसीकरण
कौठा : बारूळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कौठा केंद्रावर ३० नागरिकांना कोविडची लस देण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक संभाजी कांबळे यांना प्रथम लस देण्यात आली. यावेळी द्वारकादास शेळके, गोडबोले, सविता वाघमारे, तलाठी औदुंबर वाडीकर, ग्रामसेवक जगदेव शिंदे, हणमंत घोरपडे, पोलीस पाटील पंढरी गोदलवाड, सुरेश पवळे, शंकर देशमुख, पिरामंद सय्यद आदी उपस्थित होते.
प्रयागबाई जाधव यांचे निधन
अर्धापूर : दाभड, ता. अर्धापूर येथील प्रयागबाई तुकाराम जाधव (वय ८४) यांचे २८ मार्च रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. बालाजी जाधव यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.