ट्रकमध्ये ३५ गोण्यात आढळून आला ३७ लाखांचा गुटखा; नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 07:21 PM2021-04-02T19:21:08+5:302021-04-02T19:22:42+5:30
नांदेड ग्रामीण पोलिसांनी बोंढार बायपास येथे कारवाई
नांदेड : नांदेड ग्रामीण पोलिसांनी बोंढार बायपास येथे कारवाई करत तब्बल ३५ गोण्यातील ३७ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई १ एप्रिल रोजी रात्री साडेअकरानंतर करण्यात आली. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ट्रकचालक सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीअंतर्गत बोंढार बायपास येथे १ एप्रिल रोजी एका ट्रकमधून ( केए-३९, ८०२७ ) अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. यावरून गुन्हे शोध पथकातील कर्मचारी आणि अन्न व सुरक्षा अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ट्रक आडवून तपासणी केली. यावेळी त्यात ३५ गोण्यांमधील तब्बल ३६ ते ३७ लाख रूपयांचा गुटखा आढळून आला. ही कारवाई अन्न व सुरक्षा अधिकारी उमेश कावळे, अन्न व औषधी प्रशासन विभागातील अधिकारी प्रविण काळे व नांदेड ग्रामीण ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोउपनि एन. बी. कुंडगीर, नाईक पो.कॉ. प्रभाकर मलदोडे, नाईक पो.कॉ. श्याम नागरगोजे, पो. कॉ. शिवा पाटील व पो कॉ. चंद्रकांत स्वामी यांनी प्रभारी पो. नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
याप्रकरणी ट्रकचालक रौफ इनामदार व त्याच्या तीन साथीदारांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती ठाणे अंमलदार तथा सपोउपनि. डी. एन. मोरे यांनी दिली. दरम्यान, चालक रौफ इनामदार सद्या नांदेड येथील एका खाजगी रूग्णालयात औषधोपचार घेत आहेत. पुढील तपास प्रभारी पो. नि. अशोक घोरबांड करत आहेत. या गुन्ह्यात अनेक व्यक्तींचाही समावेश असण्याची दाट शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा पकडला असल्याने या व्यवसायात गुंतलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत.