पिसाळलेल्या घोड्याचा अर्धापूरात हैदोस; चावा घेतलेले तिघे रूग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 08:27 PM2022-07-16T20:27:52+5:302022-07-16T20:29:00+5:30
अर्धापूर शहरातील नांदेड - नागपूर मार्गे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर व परिसरात पिसाळलेल्या घोड्याने धुमाकूळ घातला.
अर्धापूर ( नांदेड) : शहरात मुख्य रस्त्यावर असलेल्या अहिल्याबाई होळकर चौक,बसवेश्वर चौक आदी ठिकाणी पिसाळलेल्या घोड्याने धुमाकूळ घालीत तीन जणांना चावा घेत जखमी केल्याची घटना अर्धापूर शहरातील मुख्य रस्त्यावर व बाजारपेठेत दि.१६ शनिवार रोजी घडली. परिसरातील नागरिक भयभीत झाल्याने बराच वेळ परिसरात गोंधळ उडाला होता. तर जखमींवर उपचार सुरू आहे.
अर्धापूर शहरातील नांदेड - नागपूर मार्गे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर व परिसरात पिसाळलेल्या घोड्याने धुमाकूळ घातला. यात घोड्याने अनेकांना चावा घेतला यावेळी धम्मपाल सरोदे, सुधाकर मोरे व अन्य एक असे जखमी झालेल्या तिघांवर नांदेड येथील रूग्णालयात उपचार सुरू आहे. पिसाळलेल्या घोड्याने अनेकांना चावा घेतल्याची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. धावत्या वाहनांना चावा घेत व वाहनांना धडका देत असल्याने वाहन चालकांसह अर्धापूर शहरातील नागरिक मोठे भयभीत झाले होते.
सदर घटनेची माहिती मिळता घटनास्थळी अर्धापूर पोलीस प्रशासन व नगरपंचायत प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. या वेळी काही लोक घोड्याला पकडण्यासाठी पुढे सरसावले घोड्यास सापळा रचून पकडले व काही वेळ बांधून ठेवले. घोड्यामुळे त्रस्त झालेल्या अर्धापूरकरांनी सुटकेचा श्वास घेतला. यावेळी नगरपंचायतींचे नगराध्यक्ष छत्रपती कानोडे,चेअरमन प्रविण देशमुख,पोलीस निरीक्षक अशोक जाधव,जमादार भिमराव राठोड,जोशी,गुरूदास आरेवार, अतुल गोदरे आदींनी घोड्याला शहराबाहेर सोडून दिले.