नांदेड गुरुद्वारा परिसरातील अनेक वर्षांपासूनच्या अतिक्रमणावर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 07:28 PM2018-02-06T19:28:47+5:302018-02-06T19:29:02+5:30
शहरातील सचखंड गुरुद्वारा भागातील प्रवेशद्वार क्रमांक १ च्या समोर फुटपाथवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अनेक वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आले होते़ या अतिक्रमणाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती़ त्यानंतर आता सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने या परिसरातील अतिक्रमणावर हातोडा चालविला़ त्यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला़
नांदेड : शहरातील सचखंड गुरुद्वारा भागातील प्रवेशद्वार क्रमांक १ च्या समोर फुटपाथवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अनेक वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आले होते़ या अतिक्रमणाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती़ त्यानंतर आता सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने या परिसरातील अतिक्रमणावर हातोडा चालविला़ त्यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला़
गुरुद्वारा गेट क्रमांक १ ते लंगर साहिबपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने फुटपाथवर २०१० पासून अतिक्रमण करण्यात आले होते़ याबाबत अनेकांनी महापालिकेकडे तक्रार केली होती़ त्याचबरोबर लोकशाही दिनातही वारंवार हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता, परंतु महापालिकेकडून अतिक्रमणाच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती़ याबाबत जगदीपसिंह नंबरदार यांनी आॅगस्ट २०१७ मध्ये विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती़ विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकार्यांना पत्र पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते़ जिल्हाधिकारी कार्यालयाने मनपाला पत्र पाठविले होते. परंतु त्यानंतरही अतिक्रमण ‘जैसे थे’ राहिले़ फुटपाथवर अतिक्रमण असल्यामुळे पायी जाणार्या भाविकांना रस्त्यावरुनच चालावे लागते.
या विषयात जगदीपसिंघ नंबरदार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती़ त्यात महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, नगरविकास मंत्रालय यांना प्रतिवादी बनविण्यात आले होते़ त्याची दखल घेत सोमवारी सकाळीच गेट क्रमांक १ च्या समोरील रस्त्यावर मोठ्या फौजफाट्यासह अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली़ यावेळी महापालिकेचे जवळपास ३० हून अधिक कामगार अतिक्रमणावर हातोडा चालवित होते़ दुपारपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे अतिक्रमण काढण्यात आले़ त्यामुळे या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला़