मुलांमुलींसाठी स्वतंत्र अपंग शाळा
By Admin | Published: January 28, 2015 02:06 PM2015-01-28T14:06:59+5:302015-01-28T14:06:59+5:30
मुलींचे होणारे शोषण थांबविण्यासाठी आता मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र निवासी शाळा कराव्यात असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
अनुराग पोवळे /नांदेड
मुलींचे होणारे शोषण थांबविण्यासाठी आता मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र निवासी शाळा कराव्यात तसेच मुली असलेल्या निवासी शाळेत कंत्राटी तत्वावर तरी महिला अधीक्षक नेमाव्यात असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाच्या लातूर विभागाचे उपायुक्त माधव वैद्य यांनी दिली.
नायगाव तालुक्यातील नरसी येथील जय मल्हार शिक्षण प्रसारक मंडळ सावरगाव पीर ता. मुखेड संचलित निवासी मूकबधीर शाळेत घडलेल्या विनयभंगाच्या घटनेनंतर २७ जानेवारी रोजी उपायुक्त माधव वैद्य यांनी त्या शाळेस भेट दिली. तसेच त्यांनी पीडित मुलीची बिलोली येथे जावून भेट घेतली. यावेळी वैद्य यांनी शाळेतील परिस्थितीची माहिती घेतली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब राठोड, समाजकल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांचीही उपस्थिती होती. शाळेतीलच तीन शिपाई असलेल्या कर्मचार्यांविरूद्ध या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीचीही त्यांनी भेट घेवून घटनेची माहिती घेतली.
या भेटीनंतर लोकमतशी बोलताना वैद्य यांनी सदर प्रकार अतिशय गंभीर असल्याने या निवासी मूकबधीर शाळेची मान्यता काढून घेण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला असल्याचे सांगितले. तसेच पीडित मुलगी मागासवर्गीय असल्याने अँट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मुलीला समाजकल्याण विभागाकडून तसेच मनोधैर्य योजनेअंतर्गत मदत देण्याचाही प्रस्ताव असल्याचे सांगितले.
दुसरीकडे निवासी अपंग शाळेतील मुलींच्या शोषणाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. या गंभीर प्रकारांवर आळा घालण्यासाठी आता निवासी स्वरूपात असलेल्या या शाळा मुले आणि मुलींसाठी स्वतंत्ररित्या चालवाव्यात असा प्रस्ताव शासनाकडे पाठविणार असल्याचे सांगितले. लातूर विभागांतर्गत आजघडीला जवळपास ३५0 निवासी शाळा आहेत. त्यात ६२ शाळा नांदेड जिल्ह्यात आहेत.
या निवासी अपंग शाळांमध्ये मूकबधीर, मतीमंद, अपंग, अंध शाळांचा समावेश आहे. ज्या शाळांमध्ये मुलीं आहेत त्या शाळांवर निवासी महिला अधीक्षक नेमणुकीचा प्रश्नही महत्वाचा आहे. त्यामुळे अशा शाळांवर कंत्राटी स्वरूपात तरी महिला अधीक्षकांची नेमणूक करण्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे उपायुक्त वैद्य म्हणाले.
दरम्यान, या प्रकरणात समाजकल्याण विभागाने विनयभंगाचे गुन्हे दाखल झालेल्या शाळेतील शिपाई चंद्रकांत बरमे, मुजीब शहाजीर आणि देवीदास तिपले यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे समाजकल्याण अधिकारी खमीतकर यांनी सांगितले.
■ नरसी येथील निवासी मूकबधीर विद्यालयाची मान्यता काढण्याचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाने शासनाकडे पाठविला आहे. या शाळेत एकूण ४0 विद्यार्थ्यांची मान्यता आहे. प्रत्यक्षात शाळेत आजघडीला एकूण ५४ विद्यार्थी आहेत. त्यात २५ मुली आहेत. मान्यता काढल्यानंतर या शाळेतील विद्यार्थी इतर शाळेत हलविण्यात येणार असल्याचे उपायुक्त वैद्य यांनी सांगितले. त्यामुळे शासनाकडून या शाळेवर कारवाई होईल हे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे पोलिसांनी मात्र या प्रकरणात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील कलम वाढवावेत अशी मागणी होत आहेत.