राष्ट्रीयकृत बँकांचा ग्राहकांप्रती दुजाभाव आर्थिक विषमता वाढवणार: शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 03:49 PM2022-05-14T15:49:48+5:302022-05-14T15:50:13+5:30
फाटके धोतर घालून जाणाऱ्यांना दोन दोन दिवस अधिकारी भेटत नाही तर सुटा-बुटातील ग्राहकास लगेचच खुर्ची दिली जाते.
नांदेड: राष्ट्रीयकृत बँकाकडून शेतकरी, गोरगरीब ग्राहकांना मिळणारी वागणूक चुकीची आहे. फाटके धोतर घालून जाणाऱ्यांना दोन दोन दिवस अधिकारी भेटत नाही तर सुटा-बुटातील ग्राहकास लगेचच खुर्ची दिली जाते. ही बाब आर्थिक विषमतेची दरी वाढविणारी आहे, अशी खंत माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली. त्यामुळे सहकारी बँका मजबूत करून ग्रामीण भागातील जनतेला आधार अन् सन्मान देण्याची गरज असल्याचे मतही पवार यांनी व्यक्त केले.
नांदेड येथे गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप सोसायटीच्या सहकारसूर्य या मुख्यालयाचा उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते. मंचावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, प.पू.सूर्यकांत देसाई गुरूजी, बाबा बलविंदरसिंघ, गोदावरी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील, संस्थेच्या अध्यक्षा राजश्री पाटील, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी पवार यांच्या हस्ते फित कापून बँकेच्या मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तद्नंतर आयोजित सोहळ्यात त्यांनी मार्गदर्शन केले. पवार म्हणाले, ग्रामीण भागातील ६० ते ६२ टक्के लोक शेती करतात. त्यात ८० टक्के शेतीयोग्य असलेल्या जमिनीपैकी ६० टक्के जमिनीला खात्रीशीर पाणी उपलब्ध होत नाही. शेती ही निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीवरील भार कमी करणे गरजेचे आहे. कुटुंबातील प्रत्येकाने शेती न करता पर्यायी व्यवसाय, उद्योगात पाऊल टाकणे गरजेचे आहे. शेतात उत्पन्न होणाऱ्या हळद, सोयाबीन, ऊस आदी पिकांशी संबंधीत उद्योग उभारण्याची गरज आहे. या उद्योग उभारणीत सहकारी बँकाचे योगदान महत्वपूर्ण असणार आहे. त्यातूनच देशाची आर्थिक सुबत्ता वाढेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
स्वतच्या पायावर उभं राहण्याची जिद्द असेल त्यांच्यासाठी नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, तेलंगणात गोदावरीने केलेले काम कौतूकास्पद आहे. ज्याप्रमाणे ऊसाचा वापर केवळ साखर काढण्यापुरता मर्यादीत न ठेवता त्याच्यापासून वीजनिर्मिती, इथेनॉल तसेच तत्सम घटक निर्माण करून अतिरिक्त पैसा कमावण्याचे काम केले जात आहे. देशातील साखर निर्यात करून ४० हजार कोटी रूपये मिळतात. त्यामुळे ऊसाप्रमाणेच सोयाबीन, कपाशी, हळदीवर विविध संशोधन होवून त्यांची उत्पादकता वाढविण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. नांदेडसह हिंगोली, परभणीमध्ये हळदीचे उत्पन्न अधिक असल्याने हिंगोली जिल्ह्यात हळद संशोधन व प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी मान्यता शासनाने दिली आहे. त्यासाठी खासदार हेमंत पाटील यांचा पाठपुरावा वाखाण्याजाेगा आहे. त्यातून निश्चितच शेतकऱ्यांचा फायदा होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
विकासासाठी एकविचार महत्वाचा
देशाच्या विकासात समविचारी लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे नेहमीच विधायक, विकासात्मक कामासाठी एका विचाराने सोबत असतात. अशीच भूमिका नेतृत्व करणाऱ्या प्रत्येकाने घेतली तर निश्चितच देशाचा विकास होवून चेहरा मोहरा बदलेल, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केले.