हिमायतनगर नगराध्यक्षपदी सेनेचे राठोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:04 AM2018-07-25T01:04:56+5:302018-07-25T01:05:27+5:30
सहा दिवसांच्या नगरसेवक पळवापळवी घडामोडीनंतर अखेर शिवसेनेने बाजी मारली़ पुढील अडीच वर्षांसाठी कुणाल राठोड यांची नगराध्यक्षपदी निवड झाली़
लोकमत न्यूज नेटवर्क
हिमायतनगर : सहा दिवसांच्या नगरसेवक पळवापळवी घडामोडीनंतर अखेर शिवसेनेने बाजी मारली़ पुढील अडीच वर्षांसाठी कुणाल राठोड यांची नगराध्यक्षपदी निवड झाली़
हिमायतनगर नगरपंचायतीत एकूण १७ सदस्य असून काँग्रेसचे १०, राष्ट्रवादी काँग्रेस २ आणि १ अपक्ष मिळून काँग्रेसकडे १३ नगरसेवक होते़ त्यामुळे काँग्रेस पक्षाचाच नगराध्यक्ष होईल, असे निश्चित मानले जात होते़ मात्र काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी विद्यमान नगराध्यक्ष अ. अखिल यांनाच उमेदवारी दिल्याने इतर इच्छुक नाराज झाले. काँग्रेसचे नाराज ३, राष्टÑवादीचे २, अपक्ष १ आणि सेनेचे ४ असे एकूण १० संख्याबळ शिवसेनेचे होवून नगराध्यक्षपदी राठोड यांची निवड झाली. नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर सर्व १० सदस्य १९ जुलै रोजी अज्ञातस्थळी रवाना झाले होते. नगरसेवकांचे मोबाईलही बंद होते.
हे सर्व नगरसेवक २३ जुलै रोजी रात्री हिमायतनगरात दाखल झाले. २४ रोजी सुमारे ३०० पोलिसांच्या बंदोबस्तात नगराध्यक्षपदाची निवड झाली. यात हात वर करुन मतदान घेण्यात आले़ कुणाल राठोड यांना १० तर अ. अखिल यांना ७ मते मिळाल्याचे जाहीर करुन पिठासीन अधिकारी महेश वडदकर यांनी नगराध्यक्षपदी राठोड यांची निवड झाल्याचे घोषित केले. उपाध्यक्षपदी अ. जावेद हजी अ. गणी यांची निवड झाली. अ. जावेद हे काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झाले होते.
यावेळी तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, मुख्याधिकारी नितीन बागुल उपस्थित होते. पोलीस निरीक्षक रवींद्र बोरसे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. नागेश पाटील आष्टीकर रात्रीपासूनच तळ ठोकून होते. दरम्यान, अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड जाहीर होताच शिवसेना समर्थकांनी हिमायतनगरात जल्लोष साजरा केला. अ. अखिल यांना पुन्हा उमेदवारी देवून माजी आ. जवळगावकर यांनी नगरपंचायत हातची गमावली. दरम्यान, काँग्रेस व राष्टÑवादीच्या नगरसेवकांनी विकासकामावर विश्वास व्यक्त करून सेनेला पाठिंबा दिला, असे आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी सांगितले.
---
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी माझ्या विकासाच्या नियोजनावर विश्वास ठेवला. नगरपंचायतच्या माध्यमातून हिमायतनगरात अंडरग्राऊण्ड नालीचे काम करुन शहराला रोगमुक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे- याशिवाय रस्ते, पाण्याची समस्या सोडविली जाईल- नागेश पाटील आष्टीकर, आमदार, हिमायतनगर- हदगाव
---
नायगाव नगराध्यक्षपदी भालेराव
नायगाव बाजार : नायगावच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे विजय भालेराव तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचेच विजय चव्हाण यांची निवड झाली़ येथील नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर प्रथमच झालेल्या निवडणुकीमध्ये १७ पैकी १३ जागा जिंकून काँग्रेसने आपल्या ताब्यात घेतल्याने पहिला नगराध्यक्षपदाचा मान सुरेखा भालेराव यांना मिळाला़ यांचा कार्यकाळ संपत आल्याने पुढील निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली़ नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत काका विजय भालेराव व पुतणे शरद भालेराव हे दोघे उतरल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले होते़ परंतु, आ़ वसंतराव चव्हाण यांनी यात समझोता केल्याने काकाचा मार्ग मोकळा झाला़ २४ जुलै रोजी निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. यात नगराध्यक्षपदी विजय दत्तात्रय भालेराव यांची अविरोध निवड झाली़ तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे विजय शंकरराव चव्हाण व सेनेचे आशा माधव कल्याण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सदस्याची विशेष सभा घेण्यात येवून हात वर करून मतदान घेण्यात आले़ यात विजय चव्हाण यांना १३ तर आशा कल्याण यांना ४ मते मिळाली़ दुसरे अध्यक्ष म्हणून राहण्याचा मान विजय भालेराव यांना तर दुसऱ्या वेळेस पुन्हा उपाध्यक्ष म्हणून राहण्याचा मान विजय चव्हाण यांना मिळाला आहे़ यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी व्ही़एल़ कोळी यांनी काम पाहिले़ तर तहसीलदार सुरेखा नांदे व भोसीकर यांनी त्यांना सहकार्य केले़