एक अंत्यविधी आटोपून दुसऱ्या अंत्यविधिला जाताना काळाचा घाला; हायवाने दोघांना चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 16:26 IST2023-12-29T16:25:47+5:302023-12-29T16:26:08+5:30
चालकाचे भरधाव वेगातील हायवावरील नियंत्रण सुटले, दुचाकीवरील दोघांना चिरडले

एक अंत्यविधी आटोपून दुसऱ्या अंत्यविधिला जाताना काळाचा घाला; हायवाने दोघांना चिरडले
- राजेश वाघमारे
भोकर : तालुक्यातील हाडोळी येथून कुंटुर ( ता.नायगाव) येथे दोघेजण दुचाकीवरून जात असतांना उमरी रस्त्यावरील मोघाळी जवळ एका हायवाने दुचाकीस जबर धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली आहे. संजय साहेबराव जाधव (४४) व शामराव पुंडलिक पाटील मिराशे (५५, दोघे रा. हाडोळी ता. भोकर ) अशी मृतांची नावे आहेत.
आज दुपारी संजय जाधव आणि शमराव मिराशे हे दोघे दुचाकीवरून (क्र. एम एच २६ बीएल ७६४२) उमरी मार्गे कुंटुर ( ता. नायगाव ) येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात होते. दुपारी दोन वाजेदरम्यान, मोघाळी जवळ उमरीकडून भोकरकडे येणाऱ्या भरधाव हायवाने (क्र. एम.एच. २६ बीई २२६७) समोरून येणाऱ्या दोघांच्या दुचाकीस जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. मयत दोघेही शेतकरी आहेत. घटनेची माहिती मिळताच भोकर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.
एक अंत्यविधी आटोपून दुसऱ्या अंत्यविधिला जाताना अपघात
मयत संजय जाधव हे नात्यातील भावजयीचा सकाळी अंत्यविधी आटोपून गावातील मित्राच्या सासऱ्याच्या अंत्यविधीसाठी कुंटुर येथे जात होते. संजय जाधव यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. तर मयत शामराव मिराशे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, २ मुली आहेत. हाडोळी गावातील दोघांचा अपघातात मृत्यू झाल्याने गवावर शोककळा पसरली होती.