'तो' भर रस्त्यात गाडीच्या नुकसान भरपाईसाठी अडून राहिला व पुढच्याच क्षणी त्याला गमवावा लागला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 04:21 PM2017-11-01T16:21:07+5:302017-11-01T16:25:37+5:30
समोरील ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने पिकअपचे झालेले नुकसान देण्याच्या मागणीसाठी भर रस्त्यात अडून राहिलेला चालक व त्याचा मित्राला अन्य एका ट्रकने धडक दिल्याने आपला जीव गमवावा लागला.
नांदेड : समोरील ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने पिकअपचे झालेले नुकसान देण्याच्या मागणीसाठी भर रस्त्यात अडून राहिलेला चालक व त्याचा मित्राला अन्य एका ट्रकने धडक दिल्याने आपला जीव गमवावा लागला. हा विचित्र अपघात आज सकाळी ६ वाजता पैनंगंगा नदीवर झाला.
माणसाचा मृत्यू अटळ असतो पण तो कुठे व कसा होईल याचा कोणास अंदाज नसतो, याचीच प्रचीती आज सकाळी पैनगंगा नदीवर हदगाव उमरखेड रस्त्यावर झालेल्या अपघातात आली. या बाबत अधिक माहिती अशी कि, पुसद येथिल समीर खान हा त्याच्या पिकअपमध्ये (MH -29 AT-0201) लातूर येथून पुसदला एकाचे दुध भाड्याने घेऊन जात होता. यावेळी गाडीत त्याचा मिञ कुणाल कांबळे व दुध विक्रेते विठ्ठल दोडके हे होते. गाडी सकाळी 4:30 वाजता हदगाव तालुक्यातील पैनंगंगा नदी च्या पुलावरुन जात असताना समोरील ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबला. यामुळे समीरची पिकअप त्यावर धडकली यामध्ये पिकअपचे बरेच नुकसान झाले. यावेळी झालेले नुकसान पाहण्यासाठी तिघेही खाली उतरले.
गाडीचे झालेले नुकसान पाहून समीर ट्रक चालकाला नुकसान भरपाई देण्याबाबत बोलत होता. तसेच त्याने ट्रकच्या चाव्यासुद्धा काढून घेतल्या व नुकसान भरपाईसाठी अडून राहिला. काही वेळाने तिघेही पिकअपचे झालेले नुकसान पाहण्यासाठी पिकअप खाली पाहत असताना मागून आलेल्या अन्य एका भरधाव ट्रकने (MH-40AK-2977 ) पिकअपला जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती कि, समीर व कुणाल यांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला व ते जागीच गतप्राण झाले, तर विठ्ठल गंभीर जखमी झाले.
नातेवाईकांना बसला धक्का
अपघात झाला तेव्हा समीर ने गावाकडे नातेवाईकांना फोन करून अपघाताची माहिती दिली होती. यावेळी त्याने केवळ गाडीचे नुकसान झाले आहे असे सांगितले होते. परंतु, घटनास्थळी येताच दोघांचे मृतदेह दिसल्याने त्यांना धक्काच बसला. दरम्यान, या विचित्र अपघातामुळे रस्त्यावरील वाहतुक जवळपास तीन तास विस्कळीत होती. घटनेची माहिती मिळताच हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव लटपटे, दत्ताञेय वाघमारे, सुदर्शन बेग व ऊमरखेडच्या पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.