मेगा अॅग्रोच्या प्रकरणात आता १३ आॅगस्टला सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:29 AM2018-08-12T00:29:19+5:302018-08-12T00:29:37+5:30
कृष्णूरच्या इंडिया मेगा अॅग्रो कंपनीवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर या ठिकाणचे १५ युनिट बंद करण्यात आले होते़ या प्रकरणात पोलिसांनी उच्च न्यायालयात कारवाईदरम्यान फक्त फ्लोअर मिल सील करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे़ त्यामुळे कंपनीचे १४ युनिट आता सुरु होणार आहेत़ कंपनी बंद करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतेच आदेश दिले नसल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले असून या प्रकरणात आता १३ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : कृष्णूरच्या इंडिया मेगा अॅग्रो कंपनीवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर या ठिकाणचे १५ युनिट बंद करण्यात आले होते़ या प्रकरणात पोलिसांनी उच्च न्यायालयात कारवाईदरम्यान फक्त फ्लोअर मिल सील करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे़ त्यामुळे कंपनीचे १४ युनिट आता सुरु होणार आहेत़ कंपनी बंद करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतेच आदेश दिले नसल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले असून या प्रकरणात आता १३ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे़
१७ जुलै रोजी पोलिसांनी कृष्णूरच्या इंडिया मेगा अॅग्रो अनाज कंपनीवर धाड मारली होती़ या ठिकाणाहून पोलिसांनी स्वस्त धान्य दुकानातील धान्याचे आठ ट्रक पकडले होते़ या प्रकरणात कंपनीच्या संचालकासह इतरांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ यावेळी पोलिसांनी कंपनीचे सर्वच्या सर्व पंधरा युनिट बंद केल्याचा आरोप कंपनीकडून करण्यात आला होता़ त्यानंतर कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली़
न्यायालयात सुनावणी दरम्यान नांदेड पोलिसांनी सर्वच्या सर्व युनिट बंद केले नसून फक्त फ्लोअर मिल बंद केले आहे, असे स्पष्ट केले़ दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या १० आॅगस्टच्या पत्रानुसार कंपनी बंद करण्याबाबत कोणतीही परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे़ त्यामुळे या प्रकरणाचा गुंता अधिक वाढला आहे़ याबाबत आता १३ आॅगस्ट रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़
दरम्यान, पोलीस कारवाईच्या धास्तीने मेगा अॅग्रो अनाज लिमिटेड कृष्णूर येथील कामगारांनी परराज्यात पलायन केले आहे़ कारखान्याचे व्यवस्थापक जयप्रकाश तापडिया यांचा जामीन फेटाळला आहे़ तापडियावर गुन्हा दाखल झाला आहे़ त्यात युनिट बंद असून चौकशीचा ससेमिरा चुकविण्यासाठी या ठिकाणच्या अनेक परप्रांतीय कामगारांनी पलायन केले आहे़ त्यात आता कंपनीचे १४ युनिट सुरु होणार असल्याची माहिती आहे़