ऊन, लग्नसराई अन् निरुत्साह; नांदेडमध्ये उत्साह, पण परभणी, हिंगोलीत मतदानाचा टक्का घसरला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 03:07 PM2024-04-27T15:07:51+5:302024-04-27T15:08:00+5:30
तिन्ही जिल्ह्यांतील अनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे बंद पडण्याचा प्रकार घडल्याने नागरिकांना मतदानासाठी प्रतीक्षा करावी लागली.
नांदेड / परभणी / हिंगोली : मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी झालेल्या मतदानात प्राथमिक आकडेवारीनुसार नांदेडमध्ये सुमारे ६५ टक्के मतदान झाले. परभणी आणि हिंगोली मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरली आहे. परभणीत ५३.७९ टक्के, तर हिंगोलीत सुमारे ५२ टक्के मतदान झाले. ऊन, लग्नसराई आणि मतदारांमधील निरुत्साह यामुळे ही टक्केवारी घसरली. तिन्ही जिल्ह्यांतील अनेक मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे बंद पडण्याचा प्रकार घडल्याने नागरिकांना मतदानासाठी प्रतीक्षा करावी लागली. अनेक केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या घटनाही घडल्या.
तिन्ही मतदारसंघांमध्ये सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाल्यानंतर मतदानाचा उत्साह दिसून आला. मात्र दुपारनंतर मतदानाचा वेग मंदावला. नांदेड मतदारसंघातील बिलोली तालुक्यात एका मतदान केंद्रावरील अनुचित प्रकार वगळता तिन्ही मतदारसंघात मतदान शांततेत पार पडले.
नांदेडमध्ये उत्साह
मतदारसंघात मतदान यंत्र बिघडण्याच्या घटना घडल्या तसेच दोन गावांत नागरिकांनी दुपारपर्यंत मतदानावर बहिष्कार घातला. बिलोली तालुक्यात मतदान यंत्र फोडल्याचीही घटना घडली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ६५ टक्के मतदान झाले. हदगाव, किनवट तालुक्यामध्ये मतदान यंत्र बंद पडण्याचा आणि बिलोली तालुक्यामध्ये मतदान यंत्र फोडण्याचा प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले.
हिंगोलीत टक्का घटला
हिंगोली : हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी २०१९ ला ६६.५० टक्के मतदान झाले होते. यावेळी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५२.०३ टक्के मतदान झाल्याने यंदा मतदानाचा टक्का घसरल्याचे प्राथमिक आकडेवारीवरून दिसत आहे. येथे सकाळी उत्साह होता; मात्र दुपारी उन्हाचा पारा चढताच मतदारांचा उत्साह मावळला. या मतदारसंघात ३९ मतदान केंद्रांवर मशीन बिघाडाचा प्रकार घडला. कुठे दहा मिनिटे तर कुठे दोन तास मतदान ठप्प राहिले. कुठेही अनुचित प्रकाराची नोंद नाही.
परभणीत उन्हाचा परिणाम
उन्हाच्या तब्बल ४१ अंश सेल्सिअसवर परभणीकरांनी मात करत परभणी मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.७९ टक्के मतदान झाले. एकूण २२९० मतदान केंद्रांवर मतदान झाले. एकूण ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतदारसंघातील ११४५ केंद्रांवर वेब कास्टिंग करण्यात आले. यासह ४७ केंद्र संवेदनशील मतदार केंद्रांवर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ४८ ठिकाणी बॅलेट व कंट्रोल युनिटसह व्हीव्हीपॅट बंद पडल्याने यंत्रणेला अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे कुठे अर्धा, तर कुठे एका तास उशिराने मतदानप्रक्रिया सुरू झाली. यामुळे मोठा गोंधळ उडाला.