माहूर तालुक्यातील हरडफमध्ये पावसाचे थैमान; ३० घरांमध्ये तीन दिवसांपासून पेटली नाही चूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:44 PM2018-08-22T13:44:18+5:302018-08-22T13:48:27+5:30
हरडफ आणि परिसरात सलग तीन दिवस पावसाने थैमान घातल्याने उभी पिके साफ झाली.
- नितेश बनसोडे
श्रीक्षेत्र माहूर (जि. नांदेड) : हरडफ आणि परिसरात सलग तीन दिवस पावसाने थैमान घातल्याने उभी पिके साफ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. पुरामुळे ४० घरांचे नुकसान झाले आहे. ३० घरांमध्ये पाणी शिरल्याने तीन दिवसांपासून या घरांत चूल पेटलेली नाही.
मागील वर्षी माहूर आणि किनवट तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांना एप्रिल-मे महिन्यात टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी आनंदीत असतानाच १५ आणि १६ आॅगस्ट रोजी मुसळधार पाऊस झाला आणि होत्याचे नव्हते झाले. या पावसाचा सर्वाधिक फटका हरडफ या गावाला बसला. हे माहूर या तालुका ठिकाणापासून १६ कि.मी. अंतरावरील हे गाव. सुमारे १७०० लोकसंख्या असलेल्या या गावात ४०५ कुटुंबे वास्तव्यास आहेत. बहुतांश कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे.
१५ आॅगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली आणि सलग २० तास तो कोसळला. हरडफ गाव व हरडफ तांडा यांच्यामध्ये असलेल्या नाल्याला पूर आला आणि बघता-बघता गावातील ४० हून अधिक घरात हे पाणी शिरले. पुराच्या पाण्यामुळे या घरांत कमरेइतके पाणी साचले. ३० कुटुंबे अक्षरश: उघड्यावर आली. या कुटुंबांच्या राहण्याची तात्पुरती व्यवस्था ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायत व अंगणवाडीमध्ये करण्यात आली.
गावातील स्वस्त धान्य दुकानदार बेबीबाई सुभाष टनमने व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी विस्थापितांच्या जेवणाची सोय केली तर रेणुकादेवी संस्थानने खाद्य पदार्थांबरोबरच साडी-चोळीचेही वाटप केले. ग्रामस्थांनी माणुसकीच्या भावनेने मागील दोन-तीन दिवसांपासून मदत केली असली तरीही ती तुटपुंजी असल्याच्या भावना या विस्थापितांनी व्यक्त केल्या. पुराची माहिती समजल्यानंतर आ. प्रदीप नाईक यांच्यासह जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, तहसीलदार विक्रम राजपूत आदींनी गावाचा तातडीने दौरा करुन ग्रामस्थांना दिलासा दिला. मात्र ठोस मदत अद्यापपर्यंत भेटलेली नाही.
पावसाने सगळेच गणित बिघडविले
हरडफ परिसरातील शेतकरी ज्वारी, कापूस, तुरीसह सोयाबिनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. यंदा समाधानकारक पाऊस असल्याने ही पिकेही चांगली होती. मात्र मुसळधार पावसाने सगळेच गणित बिघडविले. गावशिवारातील ४०७ हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ८५ टक्के शेतशिवार पाण्याखाली गेला असून उभ्या पिकांचे नुकसान पाहावत नसल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
दोन घोट पाण्यासाठी कासावीस
आभाळ फाटावे, असा पाऊस झाला असला तरी गावकऱ्यांंना पिण्याच्या दोन घोट पाण्यासाठी कासावीस व्हावे लागत आहे. हरडफ गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणारी सार्वजनिक पाणी पुरवठ्याची विहिर गावाशेजारच्या नाल्यावर आहे. पुराचे पाणी या विहिरीत घुसल्याने ग्रामपंचायतीने गावाचा पाणी पुरवठा बंद केला आहे. त्यामुळेच शुद्ध पाणी मिळणेही ग्रामस्थांना मुश्कील झाले आहे. येत्या आठ दिवसांत गावचा पाणी पुरवठा सुरळीत करू, असे सरपंच सयाबाई करपते यांनी सांगितले.
२८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित
१५ ते १७ आॅगस्ट या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसाचा तडाखा किनवटसह माहूर तालुक्याला सोसावा लागला. अनेक पिके पाण्याखाली गेली. पुराच्या पाण्यामुळे शेतजमिनी खरडल्या गेल्या. या नुकसानीबाबत कृषी विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी ८१ टक्के पिके बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. माहूर तालुक्यात ३४ हजार ६४९ हेक्टर क्षेत्रावर खरिप पेरा झाला होता. त्यातील २८ हजार ३४५ हेक्टर क्षेत्र ३३ टक्याहून अधिक बाधित झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी ए.एम. पिंपळगावकर यांनी दिली.