अर्धापूरात मुसळधार पावसाने हाहाकार; पिकांसोबत शेतकऱ्यांचे पशुधन गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 05:06 PM2021-09-07T17:06:59+5:302021-09-07T17:14:29+5:30
Rain in Nanded : शेलगाव, मेंढला, सांगवी गावांचा संपर्क तुटला
- गोविंद टेकाळे
अर्धापूर ( नांदेड ) : - जिल्ह्यात सर्वाधिक १२८.५ मि मी. पाऊस अर्धापूर तालुक्यात सोमवारी रात्री झाला. जोरदार पावसामुळे नदी, नाल्यांना मोठा पूर आले. शेलगाव खु व बु , मेंढला, सांगवी गावांचा संपर्क तुटला आहे.अस्मानी संकटाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. दाभड, मालेगाव व अर्धापूर मंडळात पावसाने दाणादाण उडवली आहे. तालुक्यांत ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने शेकडो एकर जमीन पावसाच्या पाण्याखाली गेली आहे.
अर्धापूर तालुक्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे असना नदी (मेंढला नाला) पूर आला. पुराचे पाणी शेलगाव या गावात शिरल्याने गावामध्ये चार ते पाच फुटांपर्यंत पाणी वाहत आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस अर्धापूर महसूल मंडळांमध्ये चोवीस तासांत १२८ मि.मी.रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली.अर्धापूर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नादी नाल्यात पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत असून असना नदीला पूर आल्याने. नदी काठावर असलेली शेलगाव खु व बु.,मालेगाव, कोंढा, सावरगाव, गणपुर, उमरी, देऊळ ,सांगवी / खडकी ,मेंढला, बामणी, निजामपुर वाडी, पिंपळगाव महादेव, कामठा आदी गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
काढणीस आलेले सोयाबीन पीक पाण्याखाली गेले असून नदीकाठावरील शेतात पुराचे चार ते पाच फुटांपर्यंत पाणी असुन. कापूस, तूर, सोयाबीन, मूग,ज्वारी,केळी आदी पिकांसह हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.नदीकाठच्या शेतातील पिके खरडली तर शेतातील ठिबक पाइप व पाळीव प्राणी वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी घटनास्थळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर तालुका अध्यक्ष बालाजीराव गव्हाणे आदींनी पाहणी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस अर्धापूर तालुक्यात झाला असल्याने ग्रामीण भागात व शेत शिवारात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तहसीलदार सुजित नरहरे, नायब तहसीलदार मारोतराव जगताप,पोलिस निरीक्षक अशोक जाधव,गट विकास अधिकारी मीना रावताळे, एस पी गोखले,विस्तार अधिकारी मुंडकर, मंडळ अधिकारी शफीयोद्दीन, प्रफुल्ल खंडागळे, संजय खिलारे तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक कृषी अधिकारी आदी अधिकारी यांच्यासह शासकीय यंत्रणा पूर परिस्थितीची पाहणी करत आहे.
हेही वाचा - Video : थरारक ! नदीच्या पुरात जीप वाहून गेली; एका प्रवाशाने झाडावर चढून वाचवला जीव
शेतकऱ्यांचे पशुधन गेले वाहुन
शेतकऱ्यांनी परस भर पुराच्या पाण्यात जाऊन आपल्या जनावरांचे प्राण वाचवले आहेत तर शेलगाव येथील रामराव शंकराव राजेगोरे यांचे एक लाखाचे पशुधन पुराच्या पाण्यात वाहून गेले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
४८ तासात तक्रार दाखल करावी
अर्धापूर तालुक्यातील नदीकाठच्या आदी शेतीचे नुकसानीचे फोटो काढून ४८ तासात विमा कंपनीस लेखी तक्रार ऑनलाईन पद्धतीने करावी व ऑनलाईन नोंद न झाल्यास तालुका कृषी कार्यालयात तक्रारी ची प्रत देण्यात यावी
-अनिल शिरफुले, तालुका कृषी अधिकारी ,अर्धापूर
बॅकवॉटर मुळे पुरपरिस्थितीत वाढ
गोदावरी नदी असना नदीचे पाणी घेत नसल्याने ( बॅक वॉटर ) मुळे पूर्व परिस्थितीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. शासन स्तरावर याची दखल घ्यावी व कुठलीही जिवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- बालाजी गव्हाणे, तालुकाध्यक्ष, कॉंग्रेस कमिटी अर्धापूर
हेही वाचा - video : पुराच्या पाण्यात स्टंटबाजीची हौस; कुपटा येथील दोघे थोडक्यात बचावले