'मुलाच्या १२ लाखांच्या इंजेक्शनसाठी मदत करा', मेसेज व्हायरल करून कोट्यावधी जमविले
By शिवराज बिचेवार | Published: August 25, 2023 06:32 PM2023-08-25T18:32:17+5:302023-08-25T18:32:57+5:30
सावध रहा! बालकाच्या आजारपणाचा फायदा, मदतीच्या नावावर जमविले कोट्यवधी
नांदेड- समाज माध्यमांवर दररोज गरजवंत लोकांना मदतीचे अनेक मेसेज व्हायरल होत असतात. अनेकजण दानशूरपणाच्या भावनेतून त्यांना शक्य ती मदतही करतात. नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेवून नांदेडातील एका पाच वर्षाच्या बालकाच्या व्यंगतेचे छायाचित्र त्याच्या आईसह टाकून मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यातून इम्पॅक्ट गुरु आणि क्राऊड फंडींग या दोन कंपनीच्या संचालकांनी कोट्यवधी रुपये गोळा केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणात आता सोनखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लोहा तालुक्यातील मडकी येथील शेतकरी गोविंद हरीराम मोरे यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. एका पाच वर्षीय बालकाला दुर्धर आजार असून त्याच्या उपचारासाठी दर महिन्याला लाखो रुपये लागत आहेत. त्यामुळे दानशूरांनी शक्य ती मदत करावी अशा संदेशासह व्यंग असलेल्या मुलासह त्याच्या आईच्या फोटोचा इम्पॅक्ट गुरु आणि क्राऊड फंडींग या कंपनीने वापर केला. समाज माध्यमावर हा संदेश व्हायरल करण्यात आला. त्यातून मदतीसाठी अनेक दानशूर पुढे आले. त्यांनी आजारी मुलाला मदत होईल म्हणून आर्थिक मदतही केली. अशाप्रकारे या दोन कंपन्यांनी आजारी मुलाच्या नावावर कोट्यवधी रुपये जमा केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणात मुंबई येथील कंपनीचे पियूष जैन आणि इतर संचालकाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेचे पोनि.उदय खंडेराय हे करीत आहेत.
महिन्याला १२ लाखांचे इंजेक्शन
आजारी मुलाला महिन्याला १२ लाख रुपयांचे इंजेक्शन लागते. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्यामुळे मदत करा असा संदेश सोशल मिडीयावर २०२२ पासून टाकण्यात आला होता. गेल्या वर्षभरात त्या माध्यमातून या कंपन्यांनी किती माया गोळा केली. याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.