नांदेडमधील कुख्यात रिंधाला मदत? पोलिसांवर संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 07:27 PM2020-01-10T19:27:13+5:302020-01-10T19:29:19+5:30
रिंधाला पोलिसांची साथही मिळाल्याचे कोकुलवार प्रकरणातून पुढे आले आहे.
नांदेड : काँग्रेस कार्यकर्ते तथा गोल्डमॅन गोविंद कोकुलवार यांच्यावरील गोळीबार प्रकरणात वीरेंद्र कानोजी ऊर्फ भंडारीला अटक केल्यानंतर या प्रकरणात काही पोलीस अधिकाऱ्यांनीही कुख्यात गुंड रिंधाला मदत केल्याची बाब पुढे आली आहे़ चार पोलीस कर्मचाऱ्यांच्या जबाबानंतर गुरुवारी स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत असलेल्या आणि सध्या मंगळूरपीर येथे पदोन्नतीवर बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाची चौकशी करण्यात आली. या सर्व प्रकारातून काही पोलिसांचीही रिंधाला मदत होती काय? असा प्रश्न पुढे आला आहे.
शहरात गेल्या चार वर्षापासून गोळीबार, खून, खंडणीच्या माध्यमातून धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात गुंड रिंधाला पोलिसांचीही मदत असल्याचा नवा उलगडा विरेंद्र कानोजी @ऊर्फ भंडारी यांच्या अटकेनंतर होत आहे. कोकुलवार यांच्यावर १७ आॅगस्ट रोजी दोघांनी गोळीबार केला होता. यात कोकुलवार हे गंभीर जखमी झाले होते. व्यावसायिक तसेच काँग्रेस कार्यकर्ते असलेल्या गोविंद कोकुलवार यांच्यावर खंडणी मागण्यासाठीच गोळीबार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाच्या तपासात या गोळीबार हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हरविंदरसिंघ उर्फ रिंधा असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. त्यात २७ डिसेंबर रोजी पोलिस उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी विरेंद्र सोपानराव कानोजी उर्फ भंडारी याला अटक केली. त्याच्याकडून जप्त केलेल्या ७ मोबाईलच्या तपासातून गोळीबार प्रकरणात अनेकांचा सहभाग असल्याचे उघड होत आहे. त्यात पहिल्या टप्प्यात उपविभागीय अधिकारी पाटील यांनी चार पोलिस कर्मचाऱ्यांचा जवाबही नोंदवून घेतला.
गुरुवारी या प्रकरणात मोठी धक्कादायक बाब पुढे आली आहे. स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे यांना गुरुवारी कोकुलवार गोळीबार प्रकरणात चौकशीसाठी पाचारण करण्यात आले आहे. दिघोरे हे सध्या विदर्भातील मंगळूरपीर येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांनी कोकुलवार गोळीबार प्रकरणात आतापर्यंत बरडशेवाळा येथील बजरंग ऊर्फ योध्दा नरवाडे, राजु राऊत यांना पकडले. त्यानंतर गुरुचरणसिंघ ऊर्फ लकी गील आणि सय्यद नजीजोद्दीन ऊर्फ गुड्डू यांना पकडले. त्याचवेळी रायगड जिल्ह्यातील पेण कारागृहात असलेल्या सुभाष पवार यालाही पूर्वीच अटक केली आहे. या पाच जणासह वीरेंद्र ऊर्फ वीरु भंडारी याने एकत्रितपणे हरविंदरसिंघ उर्फ रिंंधाच्या संपर्कात राहून कोकुलवारवर गोळीबार केल्याचे तपासात पुढे आले आहे. कोकुलवार गोळीबार प्रकरणातील आरोपीवर मोक्का लावण्यात आला आहे. एकूणच रिंधाला पोलिसांची साथही मिळाल्याचे कोकुलवार प्रकरणातून पुढे आले आहे.
गुन्ह्यात मदत करणाऱ्यांची गय नाहीच- मगर
सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारास जर पोलिसच मदत करीत असतील तर ही बाब गंभीर आहे. या सर्व प्रकरणाचा छडा लावला जाईल. त्यातच कितीही मोठा अधिकारी वा कर्मचारी असेल त्याने गुन्हेगारीला मदत केल्यास गय केली जाणार नाही, असे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी स्पष्ट केले. तपासातील प्रत्येक बाब बारकाईने पाहून कारवाई केली जात असल्याचेही मगर यांनी सांगितले़.