डॉक्टरच्या खून प्रकरणात पतीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:17 AM2017-08-01T00:17:11+5:302017-08-01T00:17:11+5:30
जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांची सून डॉ़चेतना विकास केंद्रे यांचा शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता़ याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला होता़ ३१ मे रोजी ही घटना घडल्यानंतर दोन महिन्यांपासून केंद्रे कुटुंबिय फरार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे यांची सून डॉ़चेतना विकास केंद्रे यांचा शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता़ याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला होता़ ३१ मे रोजी ही घटना घडल्यानंतर दोन महिन्यांपासून केंद्रे कुटुंबिय फरार आहे़ त्यात मयत चेतना यांचे पती डॉ़विकास केंद्रे याला सोमवारी पोलिसांनी पकडले आहे़
चेतना या नागपूरला शिक्षण घेत असताना त्यांचे विकास केंद्रे याच्याशी पे्रम जडले होते़ परंतु विकासच्या लग्नाला केंद्रे कुटुंबियांचा अगोदरपासूनच विरोध होता़ त्यामुळे गेल्या वर्षभरापासून त्यांच्या कुटुंबात वाद होत होता़ त्या कारणावरुन दोन्ही कुटुंबात याच विषयावरुन मारहाणीचाही प्रकार घडला होता़ त्यात ३० मे च्या रात्री चेतना या केंद्रे यांच्या घरासमोर बेशुद्धावस्थेत आढळल्या़ त्यांना शिवाजी पाटील या व्यक्तीने एका खाजगी रुग्णालयात दाखल केल होते़ रुग्णालयात चेतना यांचा मृत्यू झाला़
याप्रकरणी मयत चेतना यांच्या वडिलांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती़ त्यानुसार विकास केंद्रे, पद्माकर केंद्रे, राहूल केंद्रे, शिवाजी पाटील, खाजगी रुग्णालयातील डॉक्टरसह अन्य दोघे अशा सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता़ परंतु घटनेनंतर केंद्रे कुटुंबिय फरार झाले होते़ गेल्या दोन महिन्यांपासून शिवाजीनगर पोलीस आरोपींचा शोध घेत होते़ सोमवारी डॉ़विकास केंद्रे हा लोहा येथे असल्याची माहिती पोनि़ नरवाडे यांना मिळाली होती़ त्यानंतर नरवाडे यांनी पथकासह लोहा गाठून विकास केंद्रे याला अटक केली़ या प्रकरणात इतर आरोपींचाही शोध घेण्यात येत आहे़