रुग्णालयाच्या आतमध्ये मृत्यूचे तांडव; बाहेर वैद्यकीय संचालक, अधिष्ठाता फोटोसेशनमध्ये मग्न
By शिवराज बिचेवार | Published: October 3, 2023 12:42 PM2023-10-03T12:42:16+5:302023-10-03T12:46:42+5:30
यावेळी वैद्यकीय संचालक किंवा अधीष्ठाता यांनाही या मृत्यूच्या तांडावाची खबरबात नव्हती काय?
नांदेड : सोमवारी, विष्णुपूरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सकाळपर्यंत २४ तासात २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. आतमध्ये हे मृत्यूचे तांडव सुुरु असताना बाहेर मात्र वैद्यकीय संचालक, अधिष्ठाता आणि इतर मंडळी स्वच्छता अभियानाच्या फोटोशूटमध्ये मग्न होते.
अत्यावश्यक औषधींचा साठा नसल्यामुळे तब्बल २४ तासात २४ रुग्णांना आपला जीव गमावावा लागला होता. विशेष म्हणजे त्याच दिवशी वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर हे नांदेडला होते. रुग्णालयात प्रशासनाकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. या अभियानात वैद्यकीय संचालक म्हैसेकर यांनीही हातात झाडू घेवून सहभाग घेतला होता. यावेळी वैद्यकीय संचालक किंवा अधीष्ठाता यांनाही या मृत्यूच्या तांडावाची खबरबात नव्हती काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
‘दवा’ नाही मृत्यूचा ‘खाना’
नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नांदेडसह हिंगोली, परभणी, यवतमाळ, वाशिम अन् शेजारील तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. रुग्णांची संख्या वाढत असताना औषधांच्या तुटवड्याचा विषयही गंभीर होत चालला आहे. आजही रुग्णांना बाहेरून औषधे आणण्याचा सल्ला दिला जातो. त्यातच गेल्या २४ तासांत रुग्णालयात २४ जणांचा मृत्यू झाला असून, ६ पुरुष आणि ६ स्त्रीजातीच्या नवजात बालकांचा समावेश आहे; परंतु रुग्णालय प्रशासन मात्र अत्यवस्थ असलेल्या अन् शेवटच्या क्षणी रेफर रुग्णांचा मयतांमध्ये समावेश असल्याचा दावा करीत आहे.