'हा घ्या पुरावा, तांब्याची घागर'; मराठा बांधवाने समितीसमोर ठेवलं जुनं भांडं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 11:30 AM2023-10-19T11:30:59+5:302023-10-19T12:06:44+5:30
उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेला कालवधी आता संपुष्टात येत आहे.
नांदेड - मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात पुन्हा एकदा मराठा समाज एकटवला आहे. जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. जालन्याच्या आंतरवाली सराटी गावात जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान सरकारने एक समिती गठण केली असून ही समिती मराठा समाजाच्या कुणबी असल्याचे पुरावे शोधत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर समिती मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून नांदेडमध्ये या समितीला काही मराठा बांधवांनी १०० वर्षांपूर्वीची तांब्याची घागरच कुणबीचा पुरावा म्हणून दाखवली.
उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेला कालवधी आता संपुष्टात येत आहे. त्यामुळे, मराठा समाजही आक्रमक आरक्षणासाठी एकटवला जात आहे. त्यातच, सरकारच्या समितीनेही वेगाने काम सुरू केल्याचं दिसून येत आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीच्या पडताळणीसाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती बुधवारपासून मराठवाड्यातील जिल्ह्याजिल्ह्यात जावून निजामकालीन आणि त्यापूर्वीचे पुरावे तपासत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या समितीतील अधिकाऱ्यांना नांदेडमध्ये पुराव म्हणून तांब्याची घागर दाखवण्यात आली. या घागरी संबंधित व्यक्तीच्या नावापुढे कु. असे लिहिले आहे, जे कुणबी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
माझे आजोबा गणपत हादजी कदम यांच्या काळातील एक भांड, ज्याच्यावर गणपत हादजी कु. असं त्यावेळी लिहिलेलं आहे. ते मी इथं आणलं असून आणखी दोन भांडे घरी आहेत, असे मराठा बांधव कदम यांनी म्हटले. तसेच, हे भांडं १९२० सालचं असेल, कारण १९८२ साली माझे आजोबा वारले, तेव्हा त्यांचं वय १०० वर्षे होतं, असेही त्यांनी सांगितले. तर, समितीने हा पुरावा ग्राह्य धरला नसून हे तुम्ही हाताने टाकलं असेल, असं समितीने म्हटलं आहे. मात्र, ते भांडं पुरावा म्हणून समितीने ठेऊनही घेतलं.
छत्रपती संभाजीनगरमध्येही दिली भांडी
दरम्यान, सरकारने नियुक्त केलेली शिंदे समिती बुधवारी छत्रपती संभाजी नगरमधल्या विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाली. या समितीला पुरावे म्हणून दाखवण्यासाठी चक्क भांडी आणण्यात आणली होती. या भांड्यांवर कुणबी असल्याच्या नोंदी आहेत, असा दावा करण्यात येतोय. मराठा पंचकमिटी बेमगपुरा यांच्यावतीने आंदोलकांनी सांगितलं की, आमच्याकडे अत्यंत पुरातन भांडी आहेत. या भांड्यावर कुणबी, अशा नोंदी आहेत. लग्न समारंभ आणि भंडाऱ्याच्या कार्यक्रमात कुणबी समाजाकडून या भांड्यांचा वापर होईल.