उच्च न्यायालयाने मॅटचा निर्णय फिरविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:24 AM2021-08-17T04:24:39+5:302021-08-17T04:24:39+5:30
तुकाराम राजबा फावडे या स्टेनाेग्राफरला कपात केलेली ६ लाख ६२ हजारांची रक्कम तीन महिन्यांत परत करा, या मुदतीत परत ...
तुकाराम राजबा फावडे या स्टेनाेग्राफरला कपात केलेली ६ लाख ६२ हजारांची रक्कम तीन महिन्यांत परत करा, या मुदतीत परत न झाल्यास १२ टक्के व्याज व त्यानंतर १७ टक्के व्याज द्यावे, असे आदेश न्यायालयाने जारी केले. फावडे हे पुण्याच्या प्रादेशिक दुग्ध विकास अधिकारी कार्यालयात स्टेनाेग्राफर हाेते. त्यांना नियमानुसार पहिली व दुसरी कालबद्ध पदाेन्नती दिली गेली. ते ३० जून २०१६ ला सेवानिवृत्त झाले; मात्र तुमच्याकडे स्पीडचे सर्टिफिकेट नाही, तुम्हाला चुकून पदाेन्नती दिली गेली, असे सांगत त्यांच्या निवृत्तीलाभातून ७ लाख रुपये वजा केले गेले. मॅटमध्ये त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी ॲड. गाैरव अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत मॅटच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. तेथे न्यायालयाने केवळ तांत्रिक बाबी विचारात घेऊन दिलेला मॅटचा निर्णय खारीज केला. या खटल्यात शासनाच्यावतीने ॲड. एन. एम. मेहरा यांनी, तर याचिकाकर्त्याच्यावतीने ॲड. भूषण बांदिवडेकर व ॲड. गायत्री बांदिवडेकर यांनी काम पाहिले.
चौकट....
किती दिवस प्रतीक्षा करायची?
पैसे परत करण्याचा आदेश हाेईल याची किती दिवस प्रतीक्षा करायची, असा सवाल उपस्थित करण्यात आला. चुकून दिलेल्या पैशाची वसुली करता येत नाही, असे मॅट व उच्च न्यायालयाचे यापूर्वीचे न्यायनिवाडे आहेत. ते मॅटने मान्य केले. मात्र तरीही स्टेनाेग्राफरच्या विनंतीचा विचार केला नाही, याबाबत न्यायालयाने आश्चर्यही व्यक्त केल्याची माहिती विधी सूत्रांनी दिली.