'पदवी आहे म्हणजे पदविका आहे', उच्च शैक्षणिक पात्रता ही अपात्रता हाेऊ शकत नसल्याचा ‘मॅट’चा निर्वाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 07:37 PM2021-12-01T19:37:54+5:302021-12-01T19:42:05+5:30
आम्हाला पदविकाधारक हवा, पदवीधारक किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेला नकाे, असे म्हणून अर्ज फेटाळला गेला.
नांदेड : एखाद्या पदासाठी पदविका (डिप्लाेमा) ही शैक्षणिक पात्रता मागितली असेल आणि त्या पदासाठी पदवीधारक (डिग्री) अर्ज करीत असेल, तर त्याचीही उच्च शैक्षणिक पात्रता त्या पदासाठी अपात्रता हाेऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई मॅटचे न्यायिक सदस्य ए.पी. कुऱ्हेकर यांनी २४ नाेव्हेंबर राेजी दिला आहे. राहुल लिलाधर तायडे, असे यातील याचिकाकर्त्याचे नाव आहे.
राहुल बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे वडील पाेलीस बिनतारी संदेश (वायरलेस) विभागात सहायक फाैजदार (रेडिओ मेकॅनिक) या वर्ग-३च्या पदावर कार्यरत हाेते. नाेकरीत असताना निधन झाल्याने राहुलने अनुकंपा तत्त्वावर नाेकरी मिळविण्यासाठी अर्ज केला. त्यानुसार, बुलडाणा पाेलीस अधीक्षकांनी राहुलचे नाव प्रतीक्षा यादीत समाविष्ट केले. दरम्यान, २०१५ला पुणे येथील अप्पर पाेलीस महासंचालक कार्यालयाने (वायरलेस) वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात काढली. त्यात एएसआय हे पदही हाेते. या पदासाठी पदविकाधारक ही पात्रता मागण्यात आली हाेती. बी.ई. इलेक्ट्राॅनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन व एम.टेक. असलेल्या राहुलनेही या पदासाठी अर्ज केला.
मात्र, आम्हाला पदविकाधारक हवा, पदवीधारक किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेला नकाे, असे म्हणून राहुलचा अर्ज फेटाळला गेला. त्या विराेधात त्याने मॅटच्या नागपूर बेंचमध्ये दाद मागितली. तेथे मॅटने राहुलबाबत पुन:र्विचार करण्याचे आदेश दिले. मात्र, एडीजे पुणे कार्यालयाने त्यांना बुलडाणा एसपींना भेटण्यास सांगितले. अखेर पुण्यातील या आदेशाच्या विराेधात राहुलने २०१९ मध्ये मुंबई मॅटमध्ये ॲड.अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली. तेथे सरकारपक्षातर्फे ए.जे. चाैगुले यांनी सांगितले की, उच्चशिक्षितांचा विचार केल्यास पदविकाधारकांना नाेकरीच मिळणार नाही. मात्र, न्यायालयाने हा मुद्दा खारीज केला. राहुलला दाेन आठवड्यांत एएसआय पदावर नेमणूक देण्याचे आदेश मॅटने जारी केले. अप्पर महासंचालकांनीही अनुकंपाच्या १२ पैकी ६ जागा रिक्त असल्याने, राहुलला नाेकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले. या खटल्यात याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड.भूषण बांदिवडेकर, ॲड.गायत्री गाैरव बांदिवडेकर यांनी सहकार्य केले.
पदवी आहे म्हणजे पदविका आहे
उच्च शैक्षणिक पात्रता ही अपात्रता हाेऊ शकत नाही. उच्चशिक्षण, पदवी आहे, म्हणजे त्याच्याकडे पदविका आहे, असे समजावे, असे मॅटने स्पष्ट केले. अनुकंपाच्या पदांना परीक्षा नाही, शैक्षणिक पात्रता तपासून थेट नियुक्ती दिली जाते, याकडेही पाेलीस प्रशासनाचे लक्ष वेधले गेले.