काळजी घ्या ! दिवाळीनंतर नांदेड शहरात कोरोना रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 04:39 PM2020-11-24T16:39:56+5:302020-11-24T17:49:01+5:30
दिवाळीच्या काळात रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाल्याने अनलॉक प्रक्रियेत सर्व व्यवहार सुरळीत झाले.
नांदेड: कोरोना संकटानंतर अनलॉक प्रक्रियेत दिवाळी सण हा उत्साहात साजरा करण्यात आला. दिवाळी सणानिमित्त झालेली गर्दी कोरोना रुग्णसंख्या शहरामध्ये वाढविणारी ठरली. आठ दिवसांत ३८२ रुग्ण वाढले असून यात सर्वाधिक रुग्णसंख्याही नांदेड शहरातील आहे.
कोरोना संकटामुळे मार्चनंतर सर्वच सण, उत्सवावर विरजण पडले होते. दसऱ्यापर्यंत कोरोनाचा धोका कायमच होता. मात्र दिवाळीच्या काळात रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाल्याने अनलॉक प्रक्रियेत सर्व व्यवहार सुरळीत झाले. त्यात दिवाळी सणही तोंडावर आला. त्यामुळे खरेदीसाठी झुंबड उडाली. त्यातूनही रुग्णसंख्येत वाढ झाली. त्याचवेळी शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली. या तपासणीतही मोठ्या संख्येने रुग्ण पुढे आले. नांदेड शहरातच शिक्षकांच्या तपासणीदरम्यान रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र समोर आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती कायम असून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना महापालिका जिल्हा प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. त्या सूचनांचे पालन न केल्यास रुग्णसंख्या वाढून पुन्हा एकदा लॉकडाऊनची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.
जिल्ह्यात पाच मृत्यू
दिवाळीनंतर जिल्ह्यात कोरोनाचे पाच बळी गेले आहेत. यात १८ नोव्हेंबर रोजी दोघांचा मृत्यू झाला आहे तर १६ नोव्हेंबर, २२ व २३ नोव्हेंबर रोजी प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. दिवाळीनंतर कोरोनाबळींची संख्या घटली आहे. १७ नोव्हेंबर व १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान एक मृत्यू झाला.
दिवाळीच्या खरेदीची गर्दी ठरली रुग्णवाढीचे कारण
दिवाळी सणासाठी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक बाजारपेठेत आले. ही खरेदी करताना फिजिकल डिस्टन्सींगचे कोणतेही पालन झाले नाही. अनेकांनी मास्कचा वापरही टाळला. त्यातून कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या वाढली. जिल्हाभरातून नागरिक खरेदीसाठी नांदेड शहरात दाखल झाले होते.
दिवाळीपूर्वी कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली होती. परिणामी सर्व व्यवहार सुरळीत झाले. त्यात दिवाळी सणाच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली. जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ ही नांदेड शहर आहे. त्यात शिक्षकांच्याही चाचण्या वाढल्या.
- डॉ. सुरेशसिंह बिसेन, मनपा आरोग्य अधिकारी.