पाणीपट्टी, घरपट्टीचा ग्रामपंचायतीवर डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 12:38 AM2018-10-05T00:38:46+5:302018-10-05T00:39:09+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या उत्पन्नाची मदार पाणीपट्टी आणि घरपट्टी या दोन मुख्य आर्थिक स्त्रोतावर अवलंबुन असते़ मात्र या दोन्हीच्या थकबाकीचा डोंगर ग्रामपंचायतीवर वाढत असल्याचे दिसून येते़ पाणीपट्टीचे तब्बल १० कोटी ६० लाख थकीत आहेत़ तर घरपट्टीचाही १७ कोटी २४ लाख ६० हजाराचा डोंगर झाला आहे़ विशेष म्हणजे वसुलीची टक्केवारी अवघी २० टक्के असल्याचे दिसून येते़
विशान सोनटक्के।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या उत्पन्नाची मदार पाणीपट्टी आणि घरपट्टी या दोन मुख्य आर्थिक स्त्रोतावर अवलंबुन असते़ मात्र या दोन्हीच्या थकबाकीचा डोंगर ग्रामपंचायतीवर वाढत असल्याचे दिसून येते़ पाणीपट्टीचे तब्बल १० कोटी ६० लाख थकीत आहेत़ तर घरपट्टीचाही १७ कोटी २४ लाख ६० हजाराचा डोंगर झाला आहे़ विशेष म्हणजे वसुलीची टक्केवारी अवघी २० टक्के असल्याचे दिसून येते़
जिल्ह्यातील १६ तालुक्यांकडे २०१७-१८ अखेरची २ कोटी ९ लाख ६४ हजाराची थकबाकी आहे़ तर याच कालावधीतील पाणीपट्टीचे १ कोटी १८ लाख ९० हजार रुपये थकीत आहेत़ तालुकानिहाय घरपट्टीची थकबाकी पाहता नांदेड तालुका २० लाख ५८ हजार, अर्धापूर ४ लाख १९ हजार, मुदखेड ३ लाख १० हजार, कंधार १५ लाख ३० हजार, मुखेड १८ लाख ८ हजार, देगलूर २१ लाख ५० हजार, बिलोली १२ लाख ११ हजार, नायगाव २३ लाख ९२ हजार, धर्माबाद ९ लाख ४५ हजार, हदगाव १७ लाख ५ हजार, किनवट २० लाख ४४ हजार, भोकर ५ लाख ३८ हजार, हिमायतनगर ९ लाख १० हजार, माहूर ६ लाख ५६ हजार, उमरी ६ लाख ३ हजार तर लोहा तालुक्याची घरपट्टीची थकबाकी १६ लाख ८५ हजार एवढी आहे़ २०१७-१८ मधील घरपट्टीच्या या थकीत रक्कमे दिवसेंदिवस वाढ होत आहे़
दुसरीकडे पाणीपट्टी वसुलीची स्थितीही अशीच आहे़ जुलै अखेरपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार पाणीपट्टची मागील थकबाकी १ कोटी १८ लाखावर जावुन पोहोंचली आहे़ यात नांदेड तालुका ४ लाख ७० हजार, अर्धापूर ९ लाख ९९ हजार, मुदखेड १ लाख ३ हजार, कंधार ३ लाख ६२ हजार, मुखेड १२ लाख ९६ हजार, देगलूर ५ लाख ५२ हजार, बिलोली ४ लाख ५० हजार, नायगाव १० लाख ७४ हजार, धर्माबाद ४ लाख ५३ हजार, हदगाव १६ लाख ६४ हजार, किनवट ११ लाख २० हजार, भोकर ४ लाख ५८ हजार, हिमायतनगर ९ लाख २६ हजार, माहूर ४ लाख ५२ हजार, उमरी ५ लाख ५ हजार तर लोहा तालुक्यात १० लाख ६ हजाराची पाणीपट्टी थकीत आहे़
घरपट्टी आणि पाणीपट्टीच वसुल होणार नसेल तर ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी निधी कसा उपलब्ध होणार ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असल्याने ग्रामस्थांकडील थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी आता विशेष मोहिम राबविण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे़
जुनी थकबाकी ठरतेय डोकेदुखी
पाणीपट्टी आणि घरपट्टीचीही मागील थकबाकी वसुल होण्यास अडचणी येत असल्याने थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे़ २ कोटी ९ लाखांची २०१७-१८ मधील घरपट्टी थकीत आहे़ यातील ७१ लाख ४४ हजार वसुली करण्यात यश आले आहे़ अशीच स्थिती पाणीपट्टीच्या बाबतीतही दिसून येते़ २०१७-१८ मधील १ कोटी १८ लाख ९० हजाराची थकीत असून जुलै अखेरपर्यंत ४४ लाख ७७ हजार रुपयांची वसुली झाली आहे़ दर महिन्याच्या घर आणि पाणी पट्टीची रक्कम वाढत असतानाच जुनी थकबाकी वसुली अडचणी येत असल्याचे दिसून येते़
स्थिती दयनीय
पाणीपट्टी आणि घरपट्टी वसुलीत सर्वच तालुक्याची स्थिती दयनीय असल्याचे दिसून येते़ नांदेड तालुका पाणीपट्टीची वसुली २२़६२ टक्के, अर्धापूर १६़८० टक्के, मुदखेड २०़८७ टक्के, कंधार ३५़२८ टक्के, मुखेड १६़४९ टक्के, देगलूर १६़४५ टक्के, बिलोली १६़६४ टक्के, नायगाव २४़७२ टक्के, धर्माबाद २०़५८ टक्के, हदगाव १९़५२ टक्के, किनवट २१़३० टक्के, भोकर २३़४८ टक्के, हिमायतनगर २०़५५ टक्के, माहूर १९़४४ टक्के, उमरी ३०़१२ टक्के तर लोहा तालुक्याचे प्रमाणे २१़०८ टक्के इतके आहे़ घरपट्टीच्या वसुलीचीही अशीच स्थिती आहे़