Hinganghat Burn Case : कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी - अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:02 PM2020-02-10T12:02:58+5:302020-02-10T12:03:48+5:30
गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्युशी झुंज सुरू होती, ती अखेर अपयशी ठरली.
नांदेड: हिंगणघाट घटनेतील तरुणीच्या मृत्यूप्रकरणी मंत्री अशोक चव्हाण यांनी दुःख व्यक्त केलय. कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करत यातील आरोपीला फाशीची शिक्षा दिली जावी अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केलीय. तसेच मनाला चीड आणणारी अशी ही घटना असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा असेही ते म्हणाले आहेत. चव्हाण नांदेडमध्ये माध्यमांशी बोलत होते.
हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्युशी झुंज सुरू होती, ती अखेर अपयशी ठरली.
या घटनेनंतर राजकीय नेत्यांसह अनेकांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, ही घटना अत्यंत धक्कादायक असून मनाला वेदना देणारी आहे. देशात अशा अनेक घटना होत आहेत. आरोपींना कायद्याची भीती असावी, आपले कायदे कडक आहेत. त्याची अमलबजावणी व्हावी. अशी प्रकरणे जलद न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. याने न्याय व्यवस्थेवर जनतेचा विश्वास बसेल असेही ते यावेळी म्हणाले.