‘तलेदण्ड’ने मांडला महात्मा बसवेश्वरांच्या संघर्षाचा इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 01:00 AM2018-11-22T01:00:05+5:302018-11-22T01:03:41+5:30
सुप्रसिद्ध लेखक गिरीष कर्नाड लिखित ‘तलेदण्ड’ या नाटकाने महात्मा बसवेश्वरांच्या प्रारंभिक संघर्षाचा इतिहास रंगमंचावर उलगडविला.
नांदेड : राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची रंगत वाढत आहे. सुप्रसिद्ध लेखक गिरीष कर्नाड लिखित ‘तलेदण्ड’ या नाटकाने महात्मा बसवेश्वरांच्या प्रारंभिक संघर्षाचा इतिहास रंगमंचावर उलगडविला. बसवेश्वर यांनी प्रचलित जाती -व्यवस्था आणि वर्णव्यवस्थेवर केलेला प्रहार या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात कलाकारांना यश आले.
राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या पाचव्या दिवशीही प्रेक्षकांनी कुसुम सभागृहात मोठी गर्दी केली होती. गिरीष कर्नाड लिखित तलेदण्ड हे नाटक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नांदेड शाखेच्या वतीने सादर करण्यात आले. महात्मा बसवेश्वरांच्या जीवनावर आधारित हे नाटक नवोदित कलाकारांनी आपल्या कसदार अभिनयाद्वारे जिवंत केले. दिग्दर्शक गोविंद जोशी यांनी नवोदितांना घेवून सादर केलेला हा प्रयोग यशस्वी ठरला. गिरीष कर्नाड यांनी १९८९ मध्ये हे नाटक लिहिलेले आहे. नाट्यलेखन सुरू असताना देशात विश्वनाथ प्रतापसिंह यांचे सरकार होते. त्यांच्याच सरकारच्या पुढाकाराने देशात मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यात आली आणि आरक्षण वाढले. त्यावेळी एका मोठ्या वर्गाला जसा दिलासा मिळाला तसाच या निर्णयाला देशभरात विरोधही झाला. कर्नाड यांनी या तात्कालीक घटनेतून प्रेरणा घेवून तशाच प्रकारचे आंदोलन आणि सामाजिक उभारणीचे प्रयत्न करणारे महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन कार्यावर आधारित ही नाट्यकृती लिहिली होती. बसवेश्वर यांचा बाराव्या शतकात कर्नाटक प्रांतात जन्म झाला. त्यांनी जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढविला.
आज ‘...मरिआय’
राज्य नाट्यस्पर्धेत बुधवारी उस्मानाबादचा संघ नाटक सादर करणार होता. मात्र हे नाटक रद्द झाले. दरम्यान, गुरुवारी परळी येथील सर्वोदय शिक्षण कला अकादमीच्या वतीने विजय खानविलकर लिखित आणि अरुण सरवदे दिग्दर्शित ‘हणम्याची मरिआय’ या नाट्यप्रयोगाचे आज सादरीकरण होणार आहे.
हे कार्य करताना त्यांना संघर्ष करावा लागला. हाच संघर्ष या नाटकाच्या माध्यमातून कलाकारांनी रंगमंचावर जिवंत केला. नाटकात गोविंद जोशी, स्नेहा पवार, सायली मेनन, शिवानी रायेवार, शिवा बिरकले, विनय पावडे, आनंद तेरकर, विवेक भोगले, मीनाक्षी पाटील, श्रीनिवास देशमुख, रवी सोनवणे, नरेंद्र रत्नपारखी, अरुण खणजोडे, अभिषेक रणवीरकर, प्रशांत गबाळे, सुगुणा कोलपेवाड, शाश्वत पुजारी, कृष्णा घुगे, शुभम रत्नपारखे, ज्योत्स्ना अंबेकर, बाबाराव ढोणे, ज्योती पाटील, अंबिका नातेवाड, वेदांत स्वामी, तनुश्री पांडे, राजेश्री जोशी, गणेश कोलपेवाड, अष्टविनायक देशमुख, शुभम गबाळे, ऋषिकेश देशमुख यांनी भूमिका साकारल्या. नाटकाचे नैपथ्य अभिनव जोशी, विवेक भोगले यांनी तर आकर्षक प्रकाशयोजना स्वप्निल बनसोडे, जितेंद्रसिंह ठाकूर, रंगभूषा पुरुषोत्तम हाळदेकर, अर्चना जिरवणकर आणि वेशभूषेची जबाबदारी वैशाली गुंजकर, अपर्णा नेरलकर यांनी पार पाडली.