नांदेड येथील गुरुद्वारात रंगणार आठ दिवस होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:26 AM2018-02-23T00:26:56+5:302018-02-23T00:27:32+5:30
गुरूद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर साहिब येथे १ मार्च रोजी होळीचा सण पारंपारिकरित्या अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या होळीसाठी राज्यासह देशाच्या कानाकोप-यातील भाविक दाखल होणार असल्याने त्यांच्या निवासासह इतर सुविधांचाही आढावा घेण्यात आला असून होळीसाठी गुरूद्वारा सज्ज असल्याचे बोर्डाचे प्रभारी अधीक्षक ठाणसिंग बुंगाई यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : गुरूद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर साहिब येथे १ मार्च रोजी होळीचा सण पारंपारिकरित्या अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या होळीसाठी राज्यासह देशाच्या कानाकोप-यातील भाविक दाखल होणार असल्याने त्यांच्या निवासासह इतर सुविधांचाही आढावा घेण्यात आला असून होळीसाठी गुरूद्वारा सज्ज असल्याचे बोर्डाचे प्रभारी अधीक्षक ठाणसिंग बुंगाई यांनी सांगितले.
गुरूद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर साहिब येथे परंपरेनुसार आठ दिवसांचा होळी उत्सव साजरा करण्यात येतो. त्यामुळे या होळीची गुरूद्वारा बोर्डाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. १ मार्च रोजी होळी सण साजरा केल्यानंतर २ मार्च रोजी पारंपारिक हल्लामहल्ला मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते. याबरोबरच गुरूद्वारा परिसरात चार दिवसांचे विशेष कीर्तन दरबार आणि होळी सणाच्या रात्री रैणसभाई कीर्तन दरबार सारख्या कार्यक्रमांचेही आयोजन केले आहे.
भाविकांच्या निवासासाठी गुरूद्वारा बोर्डाच्या आठ यात्री निवासासह मंगल कार्यालय आणि इतर ठिकाणी व्यवस्था करण्यात येत आहे. याबरोबरच महाराजा रणजितसिंगजी यात्रा निवासी, गुरूद्वारा गेट नं. १ समोर आणि अन्य ठिकाणी विशेष लंगर लावण्यात येणार आहेत. होळी हल्ला महल्ला साजरा करण्यासाठी पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश, आंध्र, कर्नाटकसह महाराष्टÑातून जवळपास दोन लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे.