गुरुद्वारा येथे होळी महोत्सवाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:50 PM2018-02-27T23:50:21+5:302018-02-27T23:50:31+5:30
येथील सचखंड गुरुद्वारा येथे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, पंचप्यारे साहिबान यांच्या मार्गदर्शनाखाली होला महल्लाचे आयोजन करण्यात आले आहे़ मंगळवारपासून सुरु झालेल्या या उत्सवासाठी देश-विदेशातील तब्बल ६० हजारांवर भाविक नांदेडात दाखल झाले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड :येथील सचखंड गुरुद्वारा येथे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, पंचप्यारे साहिबान यांच्या मार्गदर्शनाखाली होला महल्लाचे आयोजन करण्यात आले आहे़ मंगळवारपासून सुरु झालेल्या या उत्सवासाठी देश-विदेशातील तब्बल ६० हजारांवर भाविक नांदेडात दाखल झाले आहेत़
गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक थानसिंह बुंगई म्हणाले, होला-महल्लानिमित्त गुरुद्वारा येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ त्यात शीख पंथाचे महान कवी, कीर्तनकार, वीररसाद्वारे संगतला गुरु इतिहास सांगतील़ २८ फेब्रुवारीला शीशगंज सेवक जत्था दिल्लीच्या वतीने कीर्तन दरबार होणार आहे़ त्यात शीख पंथाचे सुप्रसिद्ध रागी पद्मश्री भाई निर्मलसिंघजी खालसा, भाई गुरइकबालसिंघजी, भाई गुरमित सिंघजी कीर्तन-प्रवचन करणार आहेत़
रात्री ९ वाजता या कार्यक्रमास सुरुवात होणार असून मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार आहे़ गेल्या ७० वर्षांपासून मुंबईचे भाई जैमलसिंघजी सहगल परिवाराची होळी महोत्सवात रैन सवई कीर्तनाची परंपरा आहे़ यंदा १ मार्च रोजी रात्री नऊ वाजता रैन सवई कीर्तन होणार आहे़ त्यात सुप्रसिद्ध दरबार साहिब, अमृतसरचे रागी भाई जगरुपसिंघजी, भाई देविंदरसिंघजी, भाई अमरजितसिंघजी पटीयालावाले हे प्रवचनाद्वारे संगत करणार आहेत़ २ मार्च रोजी परंपरागत होळी महोत्सवानिमित्त होला-महल्ला (हल्लाबोल) नगरकीर्तन निघणार आहे़ त्यात देश-विदेशातील जवळपास सव्वालाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे़
महोत्सवाच्या तयारीसाठी सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष तारासिंघजी यांच्या मार्गदर्शनाखाली बोर्डाचे सदस्य परिश्रम घेत आहेत़ बाहेरुन येणाºया भाविकांची श्री गुरुग्रंथ साहिब भवन, मंगल कार्यालय, शाळा या ठिकाणी व्यवस्था करण्यात येत आहे़ ठिकठिकाणी भाविकांच्या भोजनाची सोय करण्यात आली आहे़
दरवर्षी होला-महल्लानिमित्त गुरुद्वारा येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते़ त्यामध्ये देशभरातील भजनी मंडळेही उत्साहाने सहभाग घेतात़ गुरुद्वारा येथून निघणारा हल्लाबोल पाहण्यासाठीही शहरवासियांसह इतर जिल्ह्यांतूनही भाविक दाखल होतात़
विमान, रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल
होला-महल्लासाठी नांदेडात येणाºया भाविकांची संख्या लक्षणीय असून अमृतसर ते नांदेडदरम्यान धावणारी सचखंड एक्स्प्रेस मागील आठवडाभरापासून हाऊसफुल्ल आहे़ त्याचबरोबर पंजाब व हरियाणा येथून खाजगी वाहनांनी भाविक नांदेडात दाखल होत आहेत़ अमृतसर-नांदेड चालणारी एअर इंडियाची विमानसेवाही हाऊसफुल्ल आहे़ दररोज नांदेडात भाविकांचे जत्थे दाखल होत आहेत़