सिलेंडरच्या स्फोटाने संसाराची राखरांगोळी; जळालेली पुस्तके पाहून चिमुकल्यांना कोसळले रडू
By शिवराज बिचेवार | Published: April 5, 2023 07:22 PM2023-04-05T19:22:58+5:302023-04-05T19:23:09+5:30
पत्रे उडाली अन् कपड्यांसह पुस्तकेही जळाली, सुदैवाने जीवितहानी नाही
नांदेड- मिस्त्री काम करुन एक-एक रुपया जोडत पत्र्याचे घर उभे केले. पत्नीनेही संसाराला हातभार लागावा म्हणून कर्ज काढून साड्यांचा व्यवसाय सुरु केला. परंतु सिलेंडरच्या स्फोटाने होत्याचे नव्हते झाले. अख्खा घराच्या राख रांगोळीत चिमुकल्यांची पुस्तकेही जळाली. ही घटना बुधवारी नसरपूर येथे घडली. सुदैवाने यावेळी घरात कोणी नसल्याने जीवितहानी टळली.
जयभीम शिरसाठ हे मिस्त्री काम करतात. त्यांनी मजूरीतून एक-एक पैसा जोडत सहा महिन्यापूर्वी नसरतपूर येथे पत्र्याचे घर बांधले. तर त्यांची पत्नी अनिता शिरसाठ या गृहिणी आहेत. संसाराला हातभार लागावा म्हणून त्यांनी काही महिन्यापूर्वीच कर्ज काढून साड्यांचा व्यवसाय सुरु केला होता. भीमजयंती असल्याने साड्यांची विक्री होवून काही पैसे पदरात पडतील अशी अपेक्षा त्यांना होती. तसेच ब्युटी पार्लरचे साहित्यही घेतले होते. त्यांची दोन मुले १४ वर्षीय सौरभ आणि ११ वर्षीय रोहित हे दोघेही शाळेत जातात. बुधवारी जयभीम शिरसाठ हे कामावर गेले होते. तर दोन्ही मुले शाळेत गेली होती.
यावेळी अनिता या एकट्याच घरी होत्या. दुपारी गॅसवर स्वंयपाक करीत असताना शेजारी राहत असलेल्या मावशीचा त्यांना फोन आला. गॅसवर भाजी ठेवून त्या मावशीकडे गेल्या. त्यानंतर काही वेळातच सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज अख्या नसरतपूर मध्ये ऐकायला मिळाला. अनिता यांनी घराकडे धाव घेतली. समोरचे भयाण चित्र पाहून त्यांची पाचावर धारणच बसली. कारण घरावरची पत्रे उडून गेली होती. घरातील सर्व साहित्यही जळून खाक झाले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने धाव घेतली. आग विझविली परंतु तोपर्यंत संसाराची राखरांगोळी झाली होती. अवघ्या काही क्षणात शिरसाठ कुटुंब उघड्यावर आले होते.
चिमुकल्यांना कोसळले रडू
शाळेतून परत आलेल्या सौरभ आणि रोहित यांना स्फोटात जळालेली पुस्तके पाहून रडू कोसळले. आता आम्ही शाळेत कसे जाणार? असा केविलवाणा प्रश्न ते आपल्या आईला विचारत होते. तर अनिता शिरसाठ यांनाही अश्रृच्या धारा आवरता येत नव्हत्या.
सहा महिन्यापूर्वीच बांधले पत्र्याचे घर
जयभीम शिरसाठ हे मिस्त्री काम करतात. त्याच्या मजूरीवरच ते मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा गाडा चालवितात. पत्नी अनिता यांनीही संसाराला मदत होईल म्हणून साड्यांचा व्यवसाय सुुरु केला होता. सहा महिन्यापूर्वीच डोक्यावर हक्काचे छत असावे म्हणून त्यांनी पत्र्याचे घर बांधले होते. परंतु आगीने होत्याचे नव्हते केले.