शिक्षणाला इमानदार राजकारणाची गरज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 01:01 AM2018-11-17T01:01:16+5:302018-11-17T01:03:38+5:30
प्रत्यक्षात शिक्षणासाठी स्वतंत्र विभागाची गरज आहे. आता शिक्षणासाठी इमानदार राजकारणाची गरज आहे. प्रामाणिक राजकारण आणि स्वच्छ नियत असेल, तर शिक्षण क्षेत्राला चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले.
नांदेड : सर्व समस्यांचे समाधान शिक्षणातच आहे. पण, त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. देशातील शिक्षण विभागाचे काम मनुष्यबळ विकास खात्याकडून बघितले जाते. प्रत्यक्षात शिक्षणासाठी स्वतंत्र विभागाची गरज आहे. आता शिक्षणासाठी इमानदार राजकारणाची गरज आहे. प्रामाणिक राजकारण आणि स्वच्छ नियत असेल, तर शिक्षण क्षेत्राला चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले.
नांदेड येथे मराठवाडा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आणि नांदेड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने मुख्याध्यापकांच्या ५८ व्या राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी बोलताना म्हणाले, दिल्लीत गेल्या दोन वर्षांपासून सरकारी शाळांचे निकाल वाढले आहेत़ जवळपास ९० टक्के मुले ही खाजगी शाळांतून सरकारी शाळांमध्ये आली आहेत़ दिल्लीचे रुपडे पालटले आहे़ १०० टक्के शाळांमध्ये फिल्टरचे पाणी मिळते़ उकृष्ट शिक्षण व्यवस्थेचे मॉडेल दिल्ली सरकारने तयार केले आहे़ केवळ आदेश काढून कामे होत नाहीत़ त्यासाठी इमानदारीने प्रयत्न करण्याची गरज आहे.शिक्षण व्यवस्थेतून केवळ संसाधन निर्मिती न होता सुसंस्कारित मानव निर्माण झाला पाहिजे. दिल्ली शासनाने राबवलेल्या अनेक उपक्रमांमुळे कौतूकास्पद शैक्षणिक यश मिळाले. देशात शिक्षण क्षेत्राला गांभीर्याने घेण्यातच आले नाही़ हे दुर्देव आहे़ विद्यार्थी गुणवान झाला तर बेईमानी, लबाडी, अशांतता व युद्ध होणारच नाही. देशच नव्हे तर जगसुद्धा या पद्धतीने सुधारू शकतो, ही किमया केवळ शिक्षणात आहे, असे सिसोदिया म्हणाले.
तर अपर्णा रामर्तीकर यांनी ‘आजची बदलती भारतीय कुटुंब व्यवस्था’ या विषयावर मार्गदर्शन केले. कुटुंब व समाजाची घडी सुरळीत राहण्यासाठी सर्व नाती जपण्याचा आई, वडील, बहीण यांचे कुटुंबातील महत्त्वाचे स्थान जपले पाहिजे. स्पंदने संक्रमित करून एका पिढीने दुसऱ्या पिढीला दिली पाहिजे. नाती जपा व सुसंस्कारीत भारतीय परंपरा निर्माण करा, असे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी, संमेलनाध्यक्ष वसंत पाटील,मारोती खेडेकर, गोविंद मेथे, शंकर डख, मोतीभाऊ केंद्रे, चंद्रशेखर पाटील, जिल्हाध्यक्ष संजय शिप्परकर, डॉ. सुरेश सावंत, अशोक जाधव, मोहन फाजगे, चंदलवाड, अशोक मोरे, हावगीर गोपछडे, युनूस पटेल, एम.बी. जाधव, भास्कर आर्वीकर, बिभीषण पाळवदे, गोविंद केंद्रे आदी उपस्थित होते.
पहिल्या सत्रात महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक गंगाधरराव म्हमाणे म्हणाले की, प्रशाकीय सुधारणेसाठी मुख्याध्यापकांनी कर्तव्य तत्परतेने काम केले पाहिजे. संचमान्यता तात्काळ करून देण्याचे अभिवचन दिले. त्याचबरोबर शालार्थ प्रणालीद्वारे वेतन देण्यात ज्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशाप्रकारची प्रलंबित प्रकरणे डिसेंबरअखेरपर्यंत निकाली काढले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
विद्यार्थ्यांमधील कॉमननेस शोधायला हवा
शिक्षण व्यवस्थाच चुकीच्या पद्धतीच्या आहे़ अभ्यासक्रम, गुण हेच ध्येय झाले आहे़ युनिकनेसह मुलांमध्ये कॉमननेसही शोधले पाहिजे़ शिक्षणातच सर्व समस्यांचे समाधान आहे़ त्यामुळेच दिल्लीत नवीन शाळा उभारणीवर जोर देण्यात आला़ मुख्याध्यापकांना अधिकचा निधी खर्च करण्याची सूट देण्यात आली़ मंत्री, अधिकारी यांच्यासह मुख्याध्यापक व शिक्षकांनी यासाठी कठोर मेहनत घेतली आहे़ ६० टक्केहून अधिक प्राचार्य परदेशातून प्रशिक्षण घेऊन आले आहेत, असे ते म्हणाले़