ऑनर किलिंग : दुसऱ्या समाजातील मुलासोबत संबंध असल्याच्या संशयातून बहिणीचा भावानेच केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 07:03 PM2020-06-25T19:03:17+5:302020-06-25T19:13:37+5:30
या प्रकरणावरुन समाजात कुटुंबाची बदनामी होत असल्याच्या रागातून कृत्य
मरखेल (जि.नांदेड): देगलूर तालुक्यातील धनगरवाडी येथील अल्पवयीन मुलीच्या खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. बहिणीचे दुसऱ्या समाजातील तरुणाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून भावानेच तिचा काटा काढल्याचे निष्पन्न झाले. मरखेल पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.
या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धनगरवाडी येथील मयत अल्पवयीन मुलीचे लोणी येथील भरत गायकवाड याच्याशी गेल्या दोन वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता. या प्रकरणावरुन समाजात कुटुंबाची बदनामी होत असल्याचा राग अनिल केरबा सूर्यवंशी याच्या मनात होता. २० जून रोजी मुलीची आई शेतीकामासाठी गेली होती, तिचा भाऊ हणेगाव येथे गेला होता. हणेगावहून परत आल्यानंतर बहीण घरात न दिसल्याने अनिलने चौकशी केली असता, गावातील एका टेलरकडे ती गेल्याचे त्याला समजले.
संतापलेल्या अनिलने टेलरकडेही चौकशी केली. मात्र, ती आढळली नाही. त्यामुळे बहीण तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली असेल, या संशयातून अनिल शेताकडे निघाला. रस्त्यातच त्याची बहिणीशी भेट झाली. दोघा बहीण-भावांत बाचाबाची झाली़ भावाने बहिणीला थोबाडीत मारले तर बहिणीने त्याच्या हातावर दगडाने मारले. या रागातून त्याने तिचा खून केल्याचे पोलीस चौकशीत कबूल केले. दरम्यान, त्याच दिवशी मयत मुलीच्या आईने मरखेल पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तिच्या मुलीचे व लोणी येथील भरत गायकवाड याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्यानेच मुलीचे बरेवाईट केले असावे, असे फिर्यादीत नमूद केल्यामुळे भरत गायकवाड याला ताब्यात घेऊन चौकशीला सुरूवात केली़ मात्र, कोणताही धागादोरा गवसला नव्हता.
आई व भाऊ अनिलने दिली गुन्ह्याची कबूली
घरातीलच कोणीतरी हे कृत्य केले असावे, अशी पोलिसांना शंका आली. त्यांनी परत मुलीच्या आईला व भावाला बोलावून कसून चौकशी केल्यानंतर मयत मुलीची आई व भाऊ अनिल याने गुन्ह्याची कबुली दिली. अनिल केरबा सूर्यवंशी याला अटक करण्यात आली असून, अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.