रुग्णालये हाऊसफुल्ल; आयसोलेशन रेल्वेवरील धूळही निघेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:15 AM2021-04-26T04:15:43+5:302021-04-26T04:15:43+5:30
नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा हैदोस सुरू आहे. शासकीय आणि खाजगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. कोविड केअर सेंटरमध्येही जागा नाही. ...
नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा हैदोस सुरू आहे. शासकीय आणि खाजगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. कोविड केअर सेंटरमध्येही जागा नाही. अशा परिस्थितीत रेल्वेने २० कोचमध्ये आयसोलेशनसाठी बेड तयार केले होते. परंतु गेल्या वर्षभरापासून आयसोलेशनसाठी असलेली ही रेल्वे माळटेकडी स्थानकातच उभी आहे. तिच्यावरील धूळही अद्याप झटकली नाही.
पहिल्या लाटेत कोरोनाची रुग्ण संख्या वाढल्याने रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेत देशभरातील अनेक रेल्वेगाड्यांमध्ये आयसोलेशनसाठी बेड तयार केले होते. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्चही करण्यात आला. नांदेड विभागातही २० कोचेस तयार करण्यात आले होते. यामध्ये जवळपास साडे तीनशेहून अधिक रुग्णांना ठेवता येणार आहे. परंतु प्रशासनाकडून अद्यापही या कोचेसचा वापरच करण्यात आला नाही. एकीकडे बेड मिळत नसल्यामुळे रुग्ण आजार अंगावर काढून घरी जात आहे. तर दुसरीकडे सुसज्ज असलेले हे कोच रिकामे आहेत.
एकाही रुग्णाने घेतला नाही लाभ
n रेल्वेने तयार केलेली कोचची गाडी माळटेकडी स्थानकातच उभी आहे. प्रशासनाने मागणी केल्यास नांदेड विभागातील जिल्ह्यात ती पाठविली जाणार आहे. परंतु अद्याप एकाही जिल्ह्याकडून अशी मागणी करण्यात आली नाही. या कोचमध्ये फक्त बेड तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी ऑक्सिजनची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना या ठिकाणी ठेवायचे असल्यास सिलिंडरची उपलब्धता करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. आतापर्यंत एकाही रुग्णाला या कोचचा लाभ झाला नाही.