आजपासून रंगणार होट्टल महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:14 AM2018-02-17T00:14:50+5:302018-02-17T00:15:10+5:30
चालुक्यकालीन शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिराची पुनर्बांधणी झाल्यानंतर पर्यटनाला चालना मिळावी या हेतूने प्रथमच होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार व रविवार (१७ व १८ फेब्रुवारी) असे दोन दिवस होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असून देगलूर व परिसरातील रसिक प्रेक्षकांना मेजवाणी ठरणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देगलूर : चालुक्यकालीन शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिराची पुनर्बांधणी झाल्यानंतर पर्यटनाला चालना मिळावी या हेतूने प्रथमच होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार व रविवार (१७ व १८ फेब्रुवारी) असे दोन दिवस होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असून देगलूर व परिसरातील रसिक प्रेक्षकांना मेजवाणी ठरणार आहे.
जिल्ह्यातील विधान परिषद व विधानसभेचे सदस्य आ. अमरनाथ राजूरकर, आ. सुभाष साबणे, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी उपलब्ध करून केलेल्या स्थानिक विकासनिधीतून येथील कार्यक्रम होत आहेत.
या महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन शनिवारी सायंकाळी होत असून यासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री रामदास कदम, राज्यमंत्री मदन येरावार, गुलाबराव पाटील, अर्जुन खोतकर, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शांताबाई पवार, नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शनिवारी सकाळी नऊ वाजता भार्गव देशमुख यांचे तबलावादन, प्रसाद साडेकर यांचे सुगम संगीत गायन तर दुपारी ‘चालुक्यकालीन स्थापत्यकला’ या विषयावर डॉ. प्रभाकर देव, सुरेश जोंधळे, प्रा. एम.जी. महाके, प्रा. किरण देशमुख या इतिहास अभ्यासकांचा सहभाग असलेले चर्चासत्र आणि सायंकाळच्या सत्रात सिनेतारका आदिती भागवत व संच यांचा कथ्थक व लावणी जुगलबंदीचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
रविवारी दिवसभरात पंडित शौनक अभिषेकी यांची शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत मैफिल, विद्यार्थ्यांसाठी बालगीते, उद्धवबापू आपेगावकर यांचे पखवाजवादन, ऐनोद्दीन वारसी यांचे बासरीवादन तर रात्रीच्या सुमारास विजय जोशी, भरत जेठवाणी व ईशा जैन यांचा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा गीतांचा कार्यक्रम होणार आहे. होट्टल येथे पहिल्यांदाच होणाºया या महोत्सवासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासन तयारीला लागले आहे़ होट्टल येथील ग्रामपंचायत व ग्रामस्थ, देगलूरमधील स्वयंसेवी संस्था यांचेही सहकार्य मिळत आहे़