महागाई किती दिवस रडवणार, पेट्रोलच्या किमती वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:17 AM2021-02-12T04:17:32+5:302021-02-12T04:17:32+5:30
नांदेड : दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत असताना आता घरगुती गॅसही महागला आहे. मागील चार महिन्यात गॅसच्या ...
नांदेड : दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत असताना आता घरगुती गॅसही महागला आहे. मागील चार महिन्यात गॅसच्या किमतीत तब्बल दीडशे रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडत असून, दररोज महागाईचा सामना करावा लागत आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत दिवसागणिक घट होऊनदेखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सतत वाढ झाली. परंतु, सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती वाढत आहेत. त्यामुळेच आगामी काळात पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दराचा सामान्यांना मोठा फटका बसत आहे. तेल कंपन्या पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये दररोज काही पैशांनी वाढ करत आहेत. परिणामी ही होणारी वाढ सहज लक्षात येत नाही. मात्र, दररोज काही पैशात होणाऱ्या वाढीमुळे पेट्रोल, डिझेलचा दर लवकरच शंभरी गाठणार आहे.
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा सामना करत असलेल्या सर्वसामान्य माणसाला आज घरगुती गॅसच्या दरवाढीचाही फटका बसत आहे. मागील चार महिन्यात गॅसचे दर तब्बल दीडशे रुपयांनी वाढले आहेत. त्यात घरगुती वापरासाठीच्या १४.२ किलो सिलिंडरचाही समावेश आहे. लॉकडाऊनमुळे बिघडलेली घडी बसवताना सर्वसामान्य नागरिकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात महागाई वाढत असल्याने जगायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आहे. नोव्हेंबर महिन्यात गॅस सिलिंडर ५९५ रुपयांना मिळत होता, आजघडीला तोच सिलिंडर ७४५ रुपयांना मिळत आहे. त्यातही अनेक ग्राहकांच्या नावे वेळेवर सबसिडी जमा होत नाही. या वाढत्या महागाईपासून सामान्य नागरिकांची कधी सुटका होणार, या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेही नाही.
चौकट
शासनाचे दुर्लक्ष
आजघडीला सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याऐवजी महागाई वाढवून शासन अडचणीच्या खाईत लोटत आहे. शासनाने महागाई कमी करण्याची गरज आहे. - गजानन मोरे, नांदेड
दरवाढ गरजेची
महागड्या गाड्या, मोबाईल घेऊ शकतो तर पेट्रोल, डिझेलची दरवाढही स्वीकारणे गरजेचे आहे. यातून मिळणाऱ्या महसुलातूनच विकासकामे होतात. देशातील रस्ते, मोठे प्रकल्प पूर्ण करायचे असतील तर दरवाढ गरजेची आहे. - महेश सूर्यवंशी, नांदेड
आर्थिक घडी विस्कटली
रोज मजुरी वाढत नाही, परंतु संसारासाठी लागणाऱ्या वस्तूंचे, धान्य, तेलाचे भाव मात्र वाढत आहेत. गॅस सिलिंडर दीडशे रुपयांनी वाढला. त्याचबरोबर तूरडाळ, गहू, तेलाची किंमतही वाढली. या महागाईमुळे आर्थिक घडी विस्कटत चालली आहे. - जिजाबाई रहाटकर, नांदेड