विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट आणखी किती दिवस चालणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:21 AM2021-07-14T04:21:30+5:302021-07-14T04:21:30+5:30
दमरेच्या नांदेड विभागातून आजघडीला ८५ ते ९० रेल्वे गाड्या सुरू आहेत. परंतु, त्यात एकही पॅसेंजर अथवा विनाआरक्षित रेल्वे नाही. ...
दमरेच्या नांदेड विभागातून आजघडीला ८५ ते ९० रेल्वे गाड्या सुरू आहेत. परंतु, त्यात एकही पॅसेंजर अथवा विनाआरक्षित रेल्वे नाही. त्यामुळे सामान्यांना हा महागडा प्रवास परवडणारा नाही. विशेष गाड्यांचा ग्रामीण भागातील जनतेला फारसा फायदा होत नाही. त्यामुळे पॅसेंजर गाड्या सुरू करणे आवश्यक आहे.
लिंबगाव येथून परभणीला अपडाऊन करण्यासाठी रेल्वेचा उपयोग होतो. परंतु, पॅसेंजर गाड्या बंद असल्याने नांदेडला जावे लागते. त्यापेक्षा पूर्णा मार्गे दुचाकीवरून परभणी गेलेले परवडत आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या विशेष गाड्यांचा आम्हा ग्रामीण भागातील प्रवाशांना काहीही उपयोग होत नाही.
- मनोज कदम, लिंबगाव
नांदेड येथून किनवटला ये-जा करण्यासाठी रेल्वेचा प्रवास सुखकर, सोपा आणि परवडणारा आहे. परंतु, अनेक विशेष गाड्यांना या ठिकाणी थांबा नसल्याने रेल्वेसेवा सुरू असून उपयोग नाही. या मार्गावर कोरोनापूर्वी सुरू असलेल्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात याव्यात, तसेच आरक्षणाची अट तत्काळ रद्द करावी.
- रावसाहेब जाधव, भोकर
तिकिटात फरक?
नांदेड येथून औरंगाबादसाठी वेगवेगळ्या गाड्यांना ७२ ते ११० रुपये तिकीट लागत होते. आज आरक्षित तिकिटाशिवाय प्रवास नसल्याने त्याच प्रवासासाठी १२० ते २०० रुपये मोजावे लागत आहेत.
आजघडीला नांदेड जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले आहे. त्याचबरोबर शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने आदेश काढले आहेत. संपूर्ण बाजारपेठ सुरू झाल्याने मार्केटमध्येही तुफान गर्दी हाेत आहे.
या सर्व बाबींचा विचार करता प्रवाशांची वाहतूक वाढली आहे. रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षणाची अट असल्याने बहुतांश नागरिक खासगी वाहनांसह बसला पसंती देत आहेत. त्यामुळे आरक्षणाची सक्ती बंद करून प्रवाशांना दिलासा देणे गरजेचे आहे.