कोरडवाहूंचे हात कोरडेच कसे ओ? बागायतीसाठी १७००० रुपये
By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: November 11, 2023 05:57 AM2023-11-11T05:57:58+5:302023-11-11T06:02:05+5:30
पश्चिम महाराष्ट्रातील बागायतदार शेतकऱ्यांना बागायती क्षेत्राची मदत दिली जाते, मग मराठवाड्यातील बागायतदारांसोबतच दुजाभाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
- रामेश्वर काकडे
नांदेड : राज्य शासनाने बागायत क्षेत्रासाठी १७ हजार तर कोरडवाहू क्षेत्रासाठी ८,५०० रुपयांची नैसर्गिक आपत्ती मदत जाहीर केली आहे. परंतु, मराठवाड्यातील बागायतदारांना कोरडवाहू क्षेत्राचीच आजपर्यंत आपत्ती मदत मिळालेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बागायतदार शेतकऱ्यांना बागायती क्षेत्राची मदत दिली जाते, मग मराठवाड्यातील बागायतदारांसोबतच दुजाभाव का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना करण्यात आलेली आहे. या निधीमध्ये केंद्राकडून ७५ टक्के तर राज्य सरकारकडून २५ टक्के निधी दिला जातो. चालू पावसाळी हंगामामध्ये म्हणजे जून ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या नुकसानीबाहेर मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
मदतीसाठी अटी काय?
शेतीपिके, फळपिके आणि वार्षिक लागवडीची पिके : कोरडवाहू क्षेत्रासाठी ८,५०० रुपये प्रतिहेक्टर आणि पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेत कमीत कमी अनुज्ञेय मदत एक हजारापेक्षा कमी नसावी.
आश्वासित जलसिंचन योजनेखालील क्षेत्र : प्रतिहेक्टर १७ हजार रुपये तर कमीत कमी अनुज्ञेय मदत दोन हजारांपेक्षा कमी नसावी. ३३ टक्के अथवा त्यापेक्षा अधिक शेतीपिकांचे नुकसान झाल्यास दोन हेक्टर मर्यादेत मदत मिळेल.
बहुवार्षिक पिके : प्रतिहेक्टरी २२,५०० रुपये मदत पेरणी केलेल्या क्षेत्राकरिता अनुज्ञेय असून, कमीत कमी २,५०० पेक्षा कमी असणार नाही.
शेतजमिनीचे नुकसान झाल्यास किती मदत?
शेतजमिनीवरील गाळ तीन इंचापेक्षा अधिक जमा झाल्याचे प्राधिकृत अधिकाऱ्याने प्रमाणित केल्यानंतर प्रतिहेक्टर १८ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. दरड कोसळणे, जमिनी खरडणे, खचणे व नदीपात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून गेल्यास अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ४७ हजार रुपये प्रतिहेक्टर मदत अनुज्ञेय आहे.