HSC Result 2024: नांदेड जिल्ह्याचा ९१.११ टक्के निकाल, यंदाही मुलींनी मारली बाजी
By प्रसाद आर्वीकर | Published: May 21, 2024 03:46 PM2024-05-21T15:46:51+5:302024-05-21T15:57:46+5:30
लातूर विभागात नांदेड जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे.
नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला असून, जिल्ह्याचा निकाल ९१.११ टक्के लागला आहे. लातूर विभागात नांदेड जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये बारावी परीक्षा घेतल्या होत्या. या परीक्षांमध्ये नांदेड जिल्ह्यातून ४० हजार ७५९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ४० हजार १८३ विद्यार्थी परीक्षेला पात्र ठरले. ३६ हजार ६१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.११ टक्के एवढे आहे. लातूर विभागात लातूर जिल्ह्याचा सर्वाधिक ९४.३० टक्के निकाल लागला आहे. त्या खालोखाल धाराशिव जिल्ह्याचा ९१.१७ टक्के आणि नांदेड जिल्ह्याचा ९१.११ टक्के निकाल लागला आहे.
निकालात मुलींनी मारली बाजी
बारावी परीक्षेच्या निकालामध्ये मुलींनी यावेळीही बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.४५ टक्के एवढे आहे. तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.३० टक्के आहे. जिल्ह्यातून १८ हजार ५९४ मुलींनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १८ हजार ३६७ मुलींनी परीक्षा दिली. १७ हजार ३४८ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.४५ टक्के आहे.
अर्धापूर तालुक्याचा सर्वाधिक निकाल
नियमित विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये अर्धापूर तालुक्याने बाजी मारली आहे. या तालुक्याचा ९७.७१ टक्के असा जिल्ह्यात सर्वाधिक निकाल लागला आहे. त्या खालोखाल नायगाव तालुक्याचा ९६.६२ टक्के , मुखेड तालुक्याचा ९६.३४ टक्के, लोहा ९५.९१, कंधार ९४.७७, बिलोली ९२.८४, किनवट ९२.९५, मुदखेड ९२.४८, उमरी ९२.३६, भोकर ९०.४७, देगलुर ८९.६६, नांदेड ८६.६१, धर्माबाद ८४.६०, हिमायत नगर ८०.७३ आणि हदगाव तालुक्याचा ७७.७५ टक्के निकाल लागला आहे.
विज्ञान शाखेचा ९७.४५ टक्के निकाल
नांदेड जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल ९७.४५ टक्के लागला आहे. कला शाखेचा ८१.६० टक्के, वाणिज्य शाखेचा ९०.७८ टक्के, व्होकेशनल ८३.८३ टक्के तर टेक्निकल सायन्स शाखेचा निकाल ७५.८२ टक्के लागला आहे.