औषधांचा प्रचंड तुटवडा; कोरोनाग्रस्तांचा मुक्काम वाढला, तर बाहेरच्यांना बेड मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:17 AM2021-04-25T04:17:31+5:302021-04-25T04:17:31+5:30
नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा मागील महिनाभरापासून हाहाकार सुरू आहे. अशा परिस्थितीत अत्यावश्यक असलेल्या औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिविर, ...
नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा मागील महिनाभरापासून हाहाकार सुरू आहे. अशा परिस्थितीत अत्यावश्यक असलेल्या औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. रेमडेसिविर, लोमो यासह फॅबी फ्लू यासह इतर औषधींचा मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला आहे. तर दुसरीकडे बाहेरच्यांना मात्र बेड मिळत नसल्याने प्रतीक्षा करावी लागत आहे.
कोरोनाची परिस्थिती सध्या प्रशासनाच्या हाताबाहेर गेली आहे. कितीही सोयी-सुविधा निर्माण केल्या, तरी त्या कमीच पडत आहेत. दररोज हजारो रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे रुग्णालयात बेडही मिळेनासे झाले आहेत. तर दुसरीकडे अत्यावश्यक असलेल्या औषधींसाठी नातेवाईक वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी करीत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून माझी आजी एका खाजगी रुग्णालयात दाखल आहे. तिचे वय ७० वर्षे आहे. त्याचबरोबर बीपी आणि शुगर आहे; परंतु अद्याप तिला रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले नाही. इंजेक्शनसाठी वणवण भटकत आहे. काही दलालांनी तर पुण्याला २५ हजार रुपयांना इंजेक्शन मिळत असल्याचे सांगितले.
- रामेश्वर टपरे
पाहुण्याचा सीटीस्कॅनचा स्कोअर १५ आहे. त्यासाठी बेड शोधतोय; परंतु व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्यामुळे सगळीकडून नकार मिळत आहे. सध्या ऑक्सिजनवर ठेवून नंतर व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून द्या, अशी विनंतीही केली; परंतु कुणी ऐकून घेण्यास तयार नाही. त्यामुळे आता रुग्णाला कुठे दाखल करावे, असा प्रश्न आहे.
- शंकर स्वामी
प्रशासन म्हणते रेमडेसिविर आहे. रुग्णालयात बेडही उपलब्ध आहेत; परंतु प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. नातेवाईक म्हणून आम्हाला अत्यवस्थ रुग्णाला घेऊन वणवण भटकावे लागते; परंतु कुठेही बेड मिळत नाही. बेड मिळाला तर इंजेक्शनची मारामार आहे. असा सगळीकडे गोंधळच गोंध आहे.
- महेंद्र देमगुंडे
डोळ्यासमोर जवळची माणसे मरत आहेत; परंतु प्रशासनात कुणाचा पायपोस कुणाला नाही. खाजगी रुग्णालयात रुग्णांची प्रचंड लूट सुरू आहे. बिले तपासणीसाठी ऑडिटर नेमले; परंतु हे ऑडिटर नेमके काय करीत आहेत, असा प्रश्न आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची लूट सुरू आहे. त्यांना कुणीच वाली नाही.
- पंकज भायेकर